ऑनलाइन लोकमत
नवाडा (बिहार), दि. ८ - दादरीमधल्या मुस्लीम हत्यप्रकरणी देशभरात रण उठले असताना नरेंद्र मोदींच्या मौनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत व नंतरच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना सांगितले की, देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका, आणि या विषयावर श्रद्धेय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी जो संदेश काल दिलाय त्याचं पालन करा.
दादरी घटनेनंतर भाजपा संघपरीवारातील नेत्यांसोबतच समाजवादी पार्टीच्या, काँग्रेसच्या व अन्य पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर टिप्पणी केली आणि उत्तर भारतातील वातावरण हिंदू व मुस्लीमांमध्ये द्वेषपूर्ण होण्यास हातभार लागला. मात्र, या सगळ्यावर नरेंद्र मोदींनी चकारही शब्द काढला नव्हता. बिहारमधल्या प्रचारसभेत बोलताना मोदींनी देशाला विकासाची गरज असल्याचे सांगताना, जर देशात एकोपा नसेल, सद्भावना नसेल, शांतता नसेल तर काय उपयोग असे सांगत या विषयावर जातीय विद्वेष भडकवणा-या कुणाचंही ऐकू नका केवळ एकोप्याचा संदेश देणा-या प्रणब मुखर्जींचा संदेश ऐका असे आवाहन मोदींनी केले.
या सभेत मोदींनी काँग्रेस, नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्या युतीवरही तुफान टीका केली आणि बिहारचा विकास केवळ भाजपाच करू शकतं असा दावा केला.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- धार्मिक वादग्रस्त विधानांबाबत बोलताना कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकू नका, अगदी माझंपण ऐकू नका. काल राष्ट्रपतींनी दिलेला संदेश तंतोतंत पाळा.
- आमचा सगळा रोख विकासावर असून विकासराज व जंगलराज अशी ही लढाई आहे. तीन तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत, अजून बरबादी नाही होऊ शकत.
- मी दिलेली आश्वासनं पाळतो. लोकसभेच्यावेळी मी आश्वासन दिलं आणि बिहारला एक लाख ६५ हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं नी आश्वासन पाळलं. आता वीज, रस्ते, शाळा, रोजगार सगळं काही येईल.
- लालू, नितिश व काँग्रेस गेली ६० वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिले, परंतु आता खुर्चीच्या मोहापायी तिघं एकत्र आले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
- नितिश कुमारांनी २०१० च्या निवडणुकांमध्ये गावागावात जात पाच वर्षांमध्ये वीज देण्याचे आश्वासन दिले होते की नाही असा सवाल मोदींनी विचारला. तसेच जर मी वीज दिली नाही तर परत निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. पण त्यांनी वचन मोडलं आणि पुन्हा मत मागताहेत.
- बिहारला विकास पाहिजे. गेली अनेक दशके बिहारला विकासापासून वंचित ठेवणा-या सध्याच्या सरकारला धडा मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.
- भारत एकसंध समाज म्हणूनच रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक राजकारण करू नका असं आवाहन केलं आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा एकोप्याच्या संदेशाचा पुनरुच्चार केला.
- धार्मिक राजकारण बंद व्हायला हवं असं सांगत सगळ्यांनी एकत्र सद्भावनेनं रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दादरी हत्येवर मौन सोडलंय. बिहारमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते.