कोझिकोड : धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचा विपर्यास केला जात आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी रविवारी येथे जनसंघाचे विचारवंत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मुस्लिमांकडे व्होट बँक म्हणून न पाहता त्यांना आपले माना. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैैठकीत बोलताना मोदी म्हणाले की, ‘सब का साथ, सब का विकास’ हे आमच्या सरकारचे लक्ष्य आहे. ही राजकीय घोषणा नाही. तर, समाजाच्या शेवटच्या स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या भाषणात मोदी यांनी धर्मनिरपेक्षता, संतुलित विकास आणि निवडणूक सुधारणांवर भर दिला. दीनदयाळ उपाध्याय यांच्या योगदानाचा उल्लेख करुन ते म्हणाले की, मुस्लिमांना बक्षीसही देउ नका आणि दोषही देउ नका. त्यांना सशक्त बनवा. ते व्होट बँकेची वा तिरस्काराची वस्तू नाहीत. त्यांना आपले समजा. भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय बैठकीत पक्षाचा जोर केरळात प्रभाव वाढविण्यावर आहे. मोदी यांनी जनसंघाच्या दिवसापासून पक्षाच्या एकूण प्रवासावर प्रकाशझोत टाकला. आम्ही वैचारिकतेशी कधी तडजोड केली नाही, असे सांगून ते म्हणाले की, येथे कोणीही वाळीत टाकलेल्यांपैकी नाही. एखादा मनुष्य जेव्हा दुखावला जातो तेव्हा संपूर्ण समाजाला त्याच्या वेदनांची जाणीव व्हायला हवी. दरम्यान, देशाच्या समस्यांवर विकास हे एकमेव उत्तर असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, समाजाच्या तळाशी असलेल्या व्यक्तीला जर संधी दिली तर त्यालाही विकासाचा लाभ मिळू शकतो. सर्वच पक्षात चांगले लोक आहेत. पण, अशा लोकांची संख्या भाजपात अधिक आहे. कारण, ते विचारांशी बांधिल आहेत, असेही ते म्हणाले. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आगामी एक वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा शुभारंभ रविवारी झाला. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, उपाध्याय यांची जयंती केंद्र सरकार आणि भाजप दोघांकडूनही साजरी केली जाईल. दरम्यान, निवडणूक सुधारणांबाबत बोलताना ते म्हणाले की, विविध निवडणुकांमुळे देशावर अनेक प्रकारे भार पडतो. अनेक पक्षांच्या नेत्यांनी याबाबत सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली आहे. यावर चर्चा होउ द्या, त्यातून अमृत बाहेर येईल, असेही ते म्हणाले. निवडणूक सुधारणांवर व्यापक विचार विमर्श करण्याची वेळ आली आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. निवडणुकीत पैशांच्या भूमिकेबाबत परिस्थिती कशी सुधारता येईल आणि एकाच वेळी निवडणुका कशा घेता येउ शकतात यावर विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
मुस्लिमांकडे व्होट बँक म्हणून पाहू नका
By admin | Published: September 26, 2016 3:44 AM