- संतोष ठाकूरनवी दिल्ली - राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांची तुलना लोकसभा निवडणुकीशी केली जाऊ नये,असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा श्रेष्ठींनी आपल्या या दोन मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांनाही चुकीची बयाणबाजी न करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: राज्य आणि केंद्राच्या कार्याची तुलना होईल,अशी वक्तव्ये करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. यामुळे मोदी सरकार आपल्या कार्याची समीक्षा करण्यास घाबरत असल्याचा चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो,असे पक्षाचे मत आहे.राजकीयदृष्ट्या अशा प्रकारच्या तुलनेमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असे केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे असून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्व राज्यातील नेत्यांना केवळ स्थानिक मुद्यांवरच चर्चा करा आणि त्यावरच मते मागा,अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. गरज पडल्यास राज्यात अमलात असलेल्या केंद्रीय योजनांवरच चर्चा करा आणि यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याचा प्रयत्न करा,असाही सल्ला पक्ष नेत्यांना देण्यात आला आहे. भाजपाचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, राज्य आणि केंद्र सरकारचे मुद्दे वेगळे असतात हे सर्वांना माहिती आहे. जनता पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान बनविण्यास इच्छुक आहे. त्यांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार हे यामागील कारण असल्याचे स्पष्ट आहे.
चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये करू नका, भाजपाच्या पक्ष नेत्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 3:43 AM