नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सातत्याने होच असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना वीरमरण आले आहे. तर 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी सीमारेषेवरील तणाव निवळण्यासाठी भावूक आवाहन केले आहे. सीमारेषेवर रक्ताची होळी खेळली जात आहे. कृपया जम्मू - काश्मीरला युद्घाचा आखाडा बनवू नका, असे आवाहन महबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला केले आहे. महबुबा मुफ्ती रविवारी पोलीस काँन्स्टेबलांच्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या," आमच्या सरहद्दीवर एक प्रकारची रक्ताची होळी खेळली जात आहे. पंतप्रधान एकीकडे म्हणतात की देशाने विकासाच्या रस्त्यावर चालले पाहिजे. पण दुसरीकडे आमच्या राज्यात नेमकी याच्या उलट परिस्थिती आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानला विनंती करते की, जम्मू-काश्मीरला आखाडा बनवू नका. दोन्ही देशांमध्ये मैत्रिचा सेतू बांधा." गुरुवारपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बीएसएफ आणि लष्कराच्या 5 जवानांचाही समावेश आहे.
8 पाकिस्तानी रेंजर्स ठार प्रत्युत्तराच्या कारवाईत भारतीय सेनेनं सांबा, आरएसपुरा आणि हीरानगर सेक्टर परिसरात पाकिस्तानचं प्रचंड नुकसान केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमारेषे पलिकडे शकरगड आणि सियालकोट परिसरात आठ पाकिस्तानी नागरिक आणि रेंजर्स मारले गेले आहेत.
पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले.