ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात परतण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विजय मल्ल्या इतक्यात तरी भारतात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
संडे गार्डीयन या वर्तमानपत्राला ई-मेलवरुन दिलेल्या मुलाखतीत मल्ल्या यांनी मला खलनायक बनवू नका असे म्हटले आहे. आपल्याला नियमानुसार कर्ज मिळाले, बँकांनी सर्व बाबींची छाननी केल्यानंतर मला कर्जे दिले तसेच आपण कायद्यापासून पळत नसल्याचा दावा मल्ल्या यांनी केला आहे.
भारतात आपण गुन्हेगार असल्यासारखा प्रचार सुरु आहे. त्यामुळे भारतात परतण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे मल्ल्या यांनी मुलाखतीत सांगितले. मागच्यावर्षी माझ्या विरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. पण त्यावेळीही मी पळालो नाही. मग आता मी गुन्हेगार असल्यासारखे चित्र का निर्माण केले जात आहे ?
कर्ज थकबाकी हा व्यावसायिक विषय आहे. जेव्हा बँकांनी कर्ज दिले तेव्हा त्यांना त्यामध्ये धोका असणार याची कल्पना होती. आमचा बिजनेस वाढत होता आणि अचानक एक दिवस बिजनेस खाली आला. मला खलनायक बनवू नका असे मल्ल्या यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.