ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी फुटीरतावादी नेत्यांची भेट घेऊ नये असा स्पष्ट संदेश भारतातर्फे पाकिस्तानला देण्यात आला आहे. येत्या २३ ऑगस्ट रोजी होणा-या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज दिल्लीत येणार असून ते एनएसए प्रमुख अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. भारत व पाकिस्तानदरम्यान महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होत असतानाच अझीज व फुटीरतावाद्यांची भेट 'योग्य' ठरणार नाही, असे भारतातर्फे पाकिस्तान उच्चायोगाला देण्यात आलेल्या संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सरताज अजीज दिल्लीत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तान उच्चायोगाने काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांना निमंत्रण देत कुरापत काढली होती. मात्र भारताने याभेटीस विरोध दर्शवत तसा स्पष्ट संदेश पाकिस्तानला दिला आहे. रशियातील 'उफा'मध्ये भारत व पाकिस्तानने एकत्र मिळून दहशतवादाविरोधात लढा देण्याचा संकल्प होता. मात्र अझीज व फुटीरतावाद्यांची भेट झाली तर ती या संकल्पाला तडा देणारी ठरेल असे सांगत ही भेट होऊ नये असे भारताने स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. ' सरताज अझीज यांच्यासोबतची फुटीरतावादी नेत्यांची बैठक उचित ठरणार नाही, असा सल्ला काल भारतातर्फे पाकिस्तान उच्चायोगाला देण्यात आला,' असे ट्विट त्यांनी केले आहे.
सरताज अझीज दिल्लीत येतील तेव्हा त्यांना भेटण्यासाठी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांना निमंत्रण दिल्यानंतरही अझीज व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची रविवारची भेट होणारच हे स्पष्ट झाल्यावर पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये होणारी राष्ट्रकुल संसदीय संघटनेची बैठक रद्द करून दुसरे काश्मिरी कार्ड टाकले. दरम्यान, अझीज यांना भेटण्यास जाता येऊ नये यासाठी फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाईज उमर फारुख यांच्यासह वरिष्ठ काश्मिरी फुटीरवादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांची मुक्तताही करण्यात आली.