ऑनलाइन टीम
इंदौर, दि. २० - अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ले करणा-यांना इशारा देत हल्लेखोरांनी हिंदूंच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असे प्रक्षोभक चिथावणीखोर विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. जम्मू काश्मीरमधील सरकार दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यात अपयशी ठरत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी लंगरवाले आणि खेचरवाले यांच्यात वाद झाला व या वादाने हिंसक वळण घेतले. यामुळे अमरनाथ यात्रा थांबवावी लागली होती. या घटनेविषयी बोलताना तोगडिया यांनी चिथावणीखोर शब्दात इशाराच देऊन टाकला. 'काही जण गुजरात विसरले असतील पण मुजफ्फरनगर ते विसरले नाहीत. हिंदूंच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. हा समाजही हातात वीट आणि दगड घेऊ शकतो.
दरम्यान, तोगडिया यांनी या हिंसक घटनेत सहभागी असलेल्या आरोपींना तातडीने अटक करुन त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणीही त्यांनी केली. केंद्र सरकारनेही एका वरिष्ठ अधिका-याला तिथे पाठवून सुरक्षेचा आढावा घ्यावा असेही तोगडिया यांनी सांगितले.