नवी दिल्ली : पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालय काम करणाऱ्या भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या मुलांना तेथील शाळांत शिक्षणासाठी पाठवू नये, अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयाने दिल्या असून, दोन देशांतील बिघडते संबंध हेच त्यामागील कारण असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.तुम्ही तुमच्या मुलांना पाकिस्तानातील शाळांमध्ये पाठवू नका. त्यांना अन्य कोणत्याही देशांत वा भारतीय शाळांमध्ये शिकायला पाठवा. तुम्हाला मुलांशिवाय राहणे शक्य नसेल, तर तुम्ही भारतात परत या, असे परराष्ट्र मंत्रालयाने सूचनेत स्पष्ट केले आहे. मात्र अधिकाऱ्यांची पत्नी वा पती यांना पाकिस्तानात राहण्याची मुभा परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.इतकेच नव्हे, तर ज्यांना पाकिस्तानी दुतावासात काम करण्यास जाण्याची इच्छा असेल, तर त्यांनीही ही बाब लक्षात ठेवावी. त्यांना आपल्या मुलांना पाकिस्तानात ठेवता येणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. आजच्या घडीला इस्लामाबादमधील अमेरिकन स्कूलमध्ये भारतीय दुतावासातील अधिकारी व कर्मचारी यांची किमान ५0 मुले शिकत आहे. त्यांना लगेचच ती शाळा सोडावी लागणार असून, भारतात वा अन्य देशांतील शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. दोन देशांतील संबंध दिवसेंदिवस तणावाचे होत असून, त्यामुळेच हा निर्णय घेतला असावा. असे निर्णय राजनैतिक संबंधांच्या आधारेच वेळोवेळी घेण्यात येत असतात. काश्मीरमधील जनतेवर भारत सरकार अत्याचार करीत आहे, असा आरोप पाकिस्तानने अलीकडेच केला आहे. शिवाय अतिरेकी बुऱ्हान वनी हा चकमकीमध्ये ठार झाल्यानंतर पाकिस्तानने त्याला शहिदाचा दर्जा दिला. दुसरीकडे काश्मीरमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे आणि अतिरेक्यांना मदत करीत आहे. तसेच येथील वातावरण बिघडवण्यासाठी पाकिस्तानमधून पैसा पुरविला जात आहे, अशी भारताची तक्रार आहे. अशा वातावरणात भारतीय दुतावासाला पूर्ण संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी भारतातर्फे इस्लामाबादला करण्यात आली आहे. दुतावासाला संरक्षण मिळाले तरी शाळेत जाणाऱ्या भारतीयांच्या मुलांना ते मिळेल का, याविषयी भारत सरकार साशंक असावे, असे दिसते.परराष्ट्र मंत्रालयाच्या या निर्णयानंतर भारतातील पाकिस्तानी दुतावासात काम करणारे राजनैतिक अधिकारी व कर्मचारी यांना येथील शाळांमध्ये पाठवू नये, अशा सूचना पाकिस्तानतर्फेही येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. (वृत्तसंस्था)
मुलांना पाकिस्तानातील शाळांत पाठवू नका
By admin | Published: July 26, 2016 1:46 AM