कोट्टायम - सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला केल्यानंतर शबरीमाला येथील आयप्पा मंदिर सोमवारपासून दोन दिवसांच्या विशेष पूजेसाठी दुसऱ्यांदा उघडले जाणार आहे. मात्र गेल्या वेळच्या कटू घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी बातमीदारी करण्यासाठी महिला पत्रकारांना शबरीमालाला पाठवू नका, असे महिलांच्या प्रवेशास विरोध करणाºया हिंदू संघटनांनी प्रसिद्धीमाध्यमांना कळविले आहे.शबरीमाला मंदिरातील १० ते ५० या वयोगटातील महिलांची प्रवेशबंदी न्यायालयाने रद्द केली. तरी गेल्या महिन्यात मंदिर पाच दिवसांसाठी उघडले तेव्हा आंदोलकांनी या वयाच्या एकाही महिलेला मंदिरापर्यंत जाऊ दिले नव्हते. महिला पत्रकारांनाही हुल्लडबाजी करून परत पाठविण्यात आले होते. आता दोन दिवसांसाठी मंदिर पुन्हा उघडणार असताना विश्व हिंदू परिषद व हिंदू ऐक्यवेदी यासारख्या संघटनांची संयुक्त आघाडी असलेल्या शबरीमाला कर्म समितीने संपादकांना पत्र पाठविले. त्यात म्हटले आहे की, १० ते ५० या वयोगटातील महिला पत्रकार मंदिर परिसरात आल्या तर परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)शांततापूर्ण आंदोलनसमितीने म्हटले आहे की, फेरविचारासाठी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १३ नोव्हेंबर रोजी विचार करणार आहे. असे असूनही राज्य सरकार पोलीस बळाचा वापर करून सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा अट्टाहास सोडण्यास तयार नसल्याने आम्हाला आमचे ‘शांततापूर्ण आंदोलन’ सुरू ठेवण्यावाचून गत्यंतर नाही.
शबरीमालाच्या वार्तांकनासाठी महिला पत्रकारांना पाठवू नका, हिंदू संघटनांचे माध्यमांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:30 AM