नवी दिल्ली : आपला आधार क्रमांक इंटरनेट अथवा समाज माध्यमांवर जाहीर वा शेअर करू नका, असा सल्ला भारतीय आधार प्राधिकरणाने नागरिकांना दिला आहे.आधारच्या सुरक्षिततेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने हा सल्ला दिला आहे. दूरसंचार नियामकीय प्राधिकरणाचे (ट्राय) मावळते अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आपला आधार क्रमांक जाहीर करून ‘मला अपाय करून दाखवा’ असे आव्हान विरोधकांना दिले होते. आधार सुरक्षित असल्याचा दावा करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते. त्यानंतर अनेकांनी आपले आधार क्रमांक आॅनलाईन शेअर केले होते. दरम्यान, अनेक हॅकर्सनी शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून त्यांची गोपनीय माहिती बाहेर काढली होती. एकाने तर त्यांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा केला होता. या पार्श्वभूमीवर आधार प्राधिकरणाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, आपला आधार क्रमांक इंटरनेट व समाजमाध्यमांवर जाहीर करण्याचे नागरिकांनी टाळावे. काहींनी आपले आधार क्रमांक इंटरनेट व समाजमाध्यमांवर जाहीर करून इतरांना आव्हान दिल्याने प्राधिकरणाकडून हा सल्ला दिला आहे. प्राधिकरणाने म्हटले की, आधार क्रमांकासोबत बँक खाते, पासपोर्ट आणि पॅन यासारखी वैयक्तिक संवेदनशील माहिती जोडलेली आहे. ही माहिती कायदेशीरदृष्ट्या जेव्हा गरज आहे, तेव्हाच सादर करायची असते. (वृत्तसंस्था)लोकसभेत पडसादआर. एस. शर्मा यांच्या कृतीचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित झाला. काँग्रेस सदस्य के. सी. वेणुगोपाल यांनी सभागृहात सांगितले की, देश डाटा फुटीच्या कालखंडातून जात आहे. अशावेळी शर्मा यांनी आधार क्रमांक जाहीर केला. त्याचा परिणाम म्हणून त्यांचे गोपनीय बँक खाते क्रमांक आणि इतर माहितीही जाहीर झाली. डाटा सुरक्षेसाठी सरकारने योग्य कृती करायला हवी.
आधार क्रमांक नेटवर शेअर करू नका; सर्व माहिती फुटण्याची व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 12:51 AM