लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यास नोटीस बजावण्यात आल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता, पंतप्रधान मोदींचं भाषण दूरदर्शनवर प्रसारित न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. चेन्नई दूरदर्शन केंद्राच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चेन्नई दूरदर्शनमधील अधिकारी वसुमथी यांनी शिस्तभंग केल्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई केल्याचं प्रसार भारतीने सांगितलं आहे. मात्र, मोदींचं भाषण प्रसारित न केल्यामुळेच अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक आर वसुमथी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आयआयटी मद्रास येथील भाषण प्रसारित होण्यापासून रोखलं होतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून डीडी पोडीगई टीव्हीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण प्रसारित करण्यासाठी परवानगी दिली होती. पण, आर वसुमथी यांनी भाषण प्रसारित होण्यापासून रोखलं.प्रसार भारतीने कारवाई करण्यामागचं कारण स्पष्टपणे सांगितलेलं नाही. तर निलंबनाच्या आदेशात शिस्तभंग केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं आहे. नागरी सेवा नियम 1965 अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 सप्टेंबर रोजी आयआयटी मद्रास येथे पदवीदान समारंभात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच प्रसारण दूरदर्शन चेन्नईने आपल्या चॅनेलवरुन प्रसारित केलं नव्हतं. त्यामुळेच, अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.