नवी दिल्ली : कोणत्याही व्यक्तीची बदनामी किंवा निंदानालस्ती करू नका, असा आदेश खासगी दूरचित्रवाहिन्या, वृत्तवाहिन्यांना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने दिला आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) कायदा, १९९५ मधील नियम क्रमांक ६ च्या अन्वये हा आदेश जारी करण्यात आला आहे.केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने म्हटले आहे की, खोट्यानाट्या गोष्टींचे प्रसारण करणे टाळावे. समाजातील विविध गटांची बदनामी होईल, अशा प्रकारचा कार्यक्रम सादर करू नये.यासंदर्भात केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने आपल्या पत्रात दिल्ली उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी दिलेल्या एका आदेशाचा उल्लेख केला आहे. त्या खटल्यामध्ये न्यायालयाने म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांनी तसेच खासगी दूरचित्रवाहिन्यांनी कोणताही कार्यक्रम सादर करताना, वृत्तांकन करताना कोणाचीही बदनामी, निंदानालस्ती करणे टाळावे. अमली पदार्थांच्या एका प्रकरणाशी आपला विनाकारण संबंध जोडण्यात येत असून तशा बातम्या प्रसारित केल्या जात आहेत, अशी तक्रार अभिनेत्री रकुलप्रीत सिंह हिने दिल्ली उच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली होती.
कोणत्याही व्यक्तीची बदनामी करू नका; माहिती खात्याचा दूरचित्रवाहिन्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:30 AM