हरीश गुप्ता, नवी दिल्लीगेल्या काही दिवसांतील घटनांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी शिवसेनेसोबतचा तणाव वाढेल असे काही केले जाऊ नये, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपा नेतृत्वास दिला आहे. त्यामुळे आमचा राष्ट्रवाद सहन होत नसेल तर भाजपाने हवे तर युतीमधून बाहेर पडावे, अशी भाषा शिवसेना करीत असली तरी युती धोक्यात येईल, अशी कोणतीही आगळीक भाजपाकडून न केली जाण्याचे संकेत मिळत आहेत.भारत - पाकिस्तानच्या मित्रत्वाला प्रोत्साहन देणारे कोणतेही कृत्य मग ते क्रिकेट, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम असो की अन्य काही खपवून घेणार नाहीच, असा इशारा देत शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याच्या तर्कवितर्कांना उधाण आणले असताना भाजपाच्या नेतृत्वानेही ठोशास ठोसा असे प्रत्युत्तर देणे चालविले आहे. या दोन पक्षांमधील वाढलेला तणाव पाहता शिवसेना फडणवीस यांच्या सरकारमधून बाहेर पडणार, असे संकेत दिले गेले आहेत.या पार्श्वभूमीवर चिंतित झालेल्या संघ नेतृत्वाने महाराष्ट्र आणि दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना रालोआ कमकुवत होईल असे काही घडायला नको, असा संदेश कळविला आहे. चिंतेच्या मुद्द्यावर राज्य सरकारने संवेदनशील असावे, असे संघ नेत्यांना वाटते. पाकिस्तानने दहशतवादाला आळा घालावा आणि ‘उफा’ ठरावाचे पालन करावे, असे मोदी सरकारने निक्षून सांगितल असताना दोन देशांमधील मित्रत्वाचे संबंधांना जाहीरपणे प्रोत्साहन दिल्याने कोणताही उद्देश साध्य होणार नाही, असे संघाला वाटते. सरकारमध्ये सहभागी होण्यात शिवसेनेला असहज वाटत असताना संघाच्या हस्तक्षेपामुळेच या पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्यास होकार दिला होता. शिवसेनेने सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला काळे फासत निषेध नोंदविणे संघाला पटलेले नाही. त्याचवेळी सुधींद्र कुलकर्र्णींबाबत संघनेत्यांच्या मनात जराही प्रेम उरलेले नाही. कुलकर्र्णींनीच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राजकीय लाभासाठी संघाच्या तत्त्वांपासून दूर जाण्याबाबत दिशाभूल केली, असे संघाचे नेते मानतात. पाकिस्तानने सहिष्णूता शिकवू नयेमाजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी आणि गझल गायक गुलाम अली यांचे मुंबईतील कार्यक्रम होऊ न देण्यासाठी घडलेल्या ‘धमकावणाऱ्या’ घटनांविषयी पाकिस्तानने चिंता व्यक्त केल्यानंतर ‘आम्हाला पाकिस्तानकडून सहिष्णूता शिकायची गरज नाही’, अशा शब्दांत भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पराराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता म्हणाला की, भारताच्या दौऱ्यावर गेलेल्या मान्यवर पाकिस्तानी व्यक्तींंचे कार्यक्रम उधळून लावण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची पाकिस्तानने गंभीर चिंतेने दखल घेतली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी भारताने घ्यावी. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना भारत सरकारमधील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, हा विषय परराष्ट्र धोरणाचा नव्हे तर कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. ज्यांच्याकडून आम्ही धडे घ्यावेत असे पाकिस्तान हे काही सहिष्णुतेचे प्रतिक नव्हे. त्यामुळे यावर पाकिस्तानकडून याविषयी उपदेश घेण्याची आम्हाला गरज नाही. भारताच्याही काही अंतर्गत उणिवा आहेत व त्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत.>> संघामुळेच शिवसेना सरकारमध्येविधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणाऱ्या सेनेला सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजी करण्यात संघानेच महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे उल्लेखनीय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत.भाजपाने राज्यात आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न वाढवायला हवेत, पण हे करताना आपले मूळ धोरण सोडायला नको, हीच संघाची भूमिका आहे. दुसरी बाब म्हणजे भाजपाच्या नेतृत्वाने बिहारमधील निवडणुकीपूर्वी बोट बुडेल असे काही करायला नको. बिहारमध्ये शिवसेनेने १६४ उमेदवार उभे केले असले तरी या राज्यात प्रभाव पाडण्यात हा पक्ष अपयशी ठरला आहे. विभक्त जोडीदाराप्रमाणे आम्ही एकत्र राहात असलो तरी शिवसेना एकतर्फीपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत एकत्र राहायलाच हवे, अशी कबुली भाजपाच्या नेतृत्वाने दिली आहे.>> शिवसेनेने सत्तेतून बाहेर का पडायचे? आमची राष्ट्रभक्ती भाजपाला टोचत असेल तर त्यांनीच राजीनामा द्यावा. शिवसेनेखेरीज राज्य करून दाखवावे. - खा. संजय राऊत>> कार्यक्रमाला परवानगी द्यायला नको होतीसरकारच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करण्यात संघाला स्वारस्य नाही; मात्र सरकारने सेनेसोबत संबंध ताणले जातील असा कार्यक्रम का होऊ दिला? या कारणावरून संघाची नाराजी लपून राहिलेली नाही. पक्षाच्या मूळ धोरणाला पूरक अशा कार्यक्रमांनाच सरकारकडून समर्थन दिले जावे, असे संघाचे मत आहे.>> पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवायांत गुंतला असल्याने खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मुंबईत करण्याला महाराष्ट्र सरकारने परवानगी द्यायलाच नको होती, असे संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
शिवसेनेसोबत ताणू नका : संघ
By admin | Published: October 14, 2015 4:27 AM