पटणा: लोक जनशक्ती पार्टी (LJP) चे नेते आणि दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले. चिराग यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेऊन लोक जनशक्ती पार्टीतून हकालपट्टी केलेले खासदार पशुपती पारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच, त्यांना मंत्रीमंडळात घेतल्यावर कोर्टात जाण्याचाही इशारा दिला. पशुपती पारस राम विलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका आहेत.
चिराग यांना आशा- मोदी असे करणार नाहीतचिराग पासवान पुढे म्हणाले की, लोजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष मी आहे. माझ्या परवानगीशिवाय पक्षाच्या कोट्यातून कोणालाही मंत्रीपद देणे योग्य नाही. तसेच, रामविलास पासवान यांच्यां विचारांना पायदळी तुडवत वेगळा गट स्थापन केलेल्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणूक आयोगालाही याची माहिती देण्यात आल्याचेही चिराग यांनी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मंत्रीमंडळात घेणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. पण, असे झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिली फुट जेडीयूमध्ये चिराग पासवान पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सर्वात आधी जनता दल यूनायटेड (JDU) मध्ये फुट पडेल. नितीश कुमारांचे सरकार दिड-दोन वर्षांपेक्षा जास्त चालणार नाही. शिवाय, खासदार पशुपती पारस यांना मंत्रीमंडळात घ्यायचे असेल तर जेडीयूमध्ये सामील करुन घ्या आणि मंत्रीमंडळात स्थान द्या, असेही ते म्हणाले.