नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत पराभव झाला, याचा अर्थ आम्ही संपलो, असे समजण्याचे कारण नाही. काही मंडळी तर काँग्रेसचा मृत्युलेख लिहायलाच निघाली आहेत. काँग्रेसची परिस्थिती तितकी वाईट अजिबातच नाही. केरळ व पंजाब या दोन राज्यांत आमची कामगिरी निश्चितच चांगली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते खा. शशी थरूर यांनी एका मुलाखतीत केले.ते म्हणाले की, आजही काँग्रेसचा हा भाजपला खरा व विश्वासार्ह पर्याय आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई लढतच राहू. राहुल गांधी यांनी एकट्याने पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेतली आणि पक्षाध्यक्षपद सोडण्याचे जाहीर केले, पण काँग्रेसच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मान्य नाही. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकांतील पराभवाची अनेक कारणे आहेत आणि त्यावर आता पक्षात विचारविमर्श, मंथन होणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, अनेक नेतेही पराभवाला कारणीभूत असू शकतात. आम्ही चुकलो की, आमच्या प्रतिस्पर्ध्याविषयीचे आमचे अंदाज चुकले, हे समजून घेणे गरजेचे आहे.भाजपने नरेंद्र मोदी नावाच्या आपल्या उत्पादनाचे (प्रॉडक्ट) खूपच आक्रमक पद्धतीने मार्केटिंग केले. मोदी हेच एकमेव देशाचे तारणहार आहेत, अशी त्यांची प्रतिमा तयार केली. त्यासाठी सोशल मीडियाचा अतिशय प्रभावी पद्धतीने वापर केला. त्यासाठी त्यांची सर्व प्रकारे प्रसिद्धी केली, असे शशी थरूर यांनी भाजपच्या विजयाबद्दल सांगितले.
काँग्रेस संपली असे समजू नका : थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 4:31 AM