- बिहारमध्ये सिंघा पंचायतीचा फतवा
पटना, दि. १९ - मुलींनी जिन्स पँट परीधान करू नये तसेच कोणताही मोबाईल फोन वापरु नये असा फतवा बिहारमधील एका पंचायतीने काढला आहे. याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारी २०१५ पासून करण्यात येणार आहे.
गोपालगंज जिल्हयातील सिंघा पंचायतीने हा फतवा काढला असल्याची माहिती जितेंद्र कुमार यांनी दिली. पंचायतीने आयोजित केलेल्या एका सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला असून या सभेला पंचायतीचा मुखिया कृष्णा चौधरी, सरपंच विनय कुमार श्रिवास्तव याच्यासह अनेक जण उपस्थित होते. मुलींनी जिन्स, ट्राउझर व मोबाईल वापरल्यास मुलींच्या शारीरिक व मानसिकतेवर दुष्परीणाम होतात. त्यामुळे मुलींनी जिन्स व मोबाईलचा वापर करु नये असे, मुखिया कृष्णा चौधरी यांनी म्हटले. मुलींच्या पालकांना यासंबंधी विनंती करण्यात आली आहे की, आपल्या मुलींना जिन्स आणि मोबाईल खरेदी करून देवू नये. पंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे. एखाद्या मुलीकडे मोबाईल व जिन्स आढळल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे शिक्षा करणार नसल्याचे सांगायलाही कृष्णा चौधरी विसरले नाहीत.