लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तुम्हाला निवडणुकीच्याच वेळी शरद पवारांची आठवण येते का, असा सवाल करीत तुमचे ‘घड्याळ’ चिन्ह काढून घ्यावे लागेल, अशी वेळ आणू नका, अशा सज्जड शब्दांत आज सर्वोच्च न्यायालयानेअजित पवार गटाला तंबी दिली.
शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापरणार नाही, अशी बिनशर्त लेखी हमी अजित पवार गटाने शनिवारपर्यंत दाखल करण्याचे आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी, १९ मार्च रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी ठेवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव
तसेच निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ बहाल करीत अजित पवार गटाला अधिकृत पक्ष असल्याची मान्यता देणाऱ्या निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका शरद पवार यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीदरम्यान अजित पवार गटाकडून अजूनही शरद पवार यांच्या फाेटाेचा वापर केला जात आहे, असा आराेप शरद पवार यांच्यावतीने अभिषेक सिंघवी यांनी केला.
‘घड्याळा’ऐवजी पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह दिले असून अजित पवारांच्या पक्षालाही नवे चिन्ह दिले जावे, अशी मागणी सिंघवी यांनी केली. त्यावर आम्हाला पक्षाचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि मनिंदरसिंह यांनी केला.
शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातच याचिका केली असून, त्यावर आम्हाला निर्णय द्यायचा आहे. समजा ऐन निवडणुकीदरम्यान आम्ही निवडणूक आयोगाचा निकाल रद्दबातल केला तर काय होईल? अजित पवार गटाने घड्याळाऐवजी पर्यायी निवडणूक चिन्हाविषयीही विचार करावा, असा आमचा सल्ला असेल, अशी मौखिक टिप्पणी न्या. सूर्यकांत यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून शरद पवार गटाला दिलेले ‘राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार’ हे पक्षाचे नाव तसेच ‘तुतारी’ हे चिन्ह राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत वापरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली परवानगी २७ फेब्रुवारी रोजी संपली आहे.
तुम्हाला निवडणुकीच्या वेळीच शरद पवारांची आठवण येते का?
- प्रचारात शरद पवारांचे छायाचित्र वापरा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ कार्यकर्त्यांना करीत असल्याची तक्रार शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी केली.
- त्यावर तुम्हाला निवडणुकीच्या वेळीच शरद पवारांची आठवण येते का, अशा शब्दांत न्यायालयाने रोष व्यक्त केला.
- तुमचे घड्याळ चिन्ह काढून घ्यावे लागेल, अशी वेळ आणू नका, असा इशाराही न्यायालयाने दिला. दरम्यान, समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या पक्ष कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवणे अवघड असल्याचा दावा अजित पवार यांच्या वकिलांनी केला.