ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - व्होडाफोन किंवा एअरटेलसारख्या अन्य दूरसंचार कंपन्यांची सेवा घेत असाल, तर पोर्ट करून रिलायन्स जिओ 4जी हे आपलं नेटवर्क वापरा अशी सूचना रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रिलायन्सच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 40,000 असून कंपनीचा कॉर्पोरेट प्लॅन जिओचा करण्यात आल्याचे मनुष्यबळ विभागाने जाहीर केले आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे की, तुम्ही तुमचा आत्ताचा नंबर कायम ठेवत एमएनपी किंवा मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी करून मोबाईल सेवा जिओमध्ये बदलून घ्या. डिसेंबर 2015 मध्ये मर्यादित प्रमाणात 4जी च्या चाचण्या रिलायन्सने सुरू केल्या असल्या तरी अद्याप अधिकृतपणे ही सेवा बाजारात दाखल करण्यात आलेली नाही.
आत्तापर्यंत रिलायन्सचे कॉर्पोरेट प्लॅन एअरटेल किंवा व्होडाफोनचे होते, जे बदलून जिओचे करण्यात येत आहेत. जिओ 4 जी हे जगातलं सगळ्याच मोठं इंटरनेटचं नेटवर्क असेल असा दावा कंपनीने केला असून 1.34 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ज्यावेळी ही सेवा संपूर्ण सुरू होईल त्यावेळी तिचा विस्तार 18,000 शहरं व 2 लाख खेडी इतका प्रचंड असेल असेही सांगण्यात येत आहे.