भाजपा, आप, राष्ट्रवादीला मतदान नको - हार्दिक पटेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:24 AM2017-12-05T04:24:27+5:302017-12-05T04:25:04+5:30
भाजपा, आप, राष्ट्रवादी या पक्षांना मतदान करू नका, तर जो पक्ष सत्ता स्थापन करू शकेल अशा पक्षाला मतदान करा, असे आवाहन हार्दिक पटेल यांनी केले आहे.
सुरत : भाजपा, आप, राष्ट्रवादी या पक्षांना मतदान करू नका, तर जो पक्ष सत्ता स्थापन करू शकेल अशा पक्षाला मतदान करा, असे आवाहन हार्दिक पटेल यांनी केले आहे.
सुरतमध्ये सभेत हार्दिक पटेल म्हणाले की, पाटीदारांना दुसरा पर्याय नाही, असे भाजपाला वाटत आहे. पण २००७मध्ये गोर्धन जडाफिया यांनी महागुजरात जनता परिषद आणि २०१२मध्ये केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीने पर्याय देण्याचा प्रयत्न केला होता. पण, या विरोधाचे मतांमध्ये परिवर्तन झाले नव्हते. या वेळी मात्र आपली शक्ती दाखवून देण्याची वेळ आली आहे.
पटेल यांनी या चौकात तरुणांना सोबत घेत शपथ घेतली की, ज्या लोकांनी आंदोलनात १४ पाटीदार तरुणांना मारले आहे त्यांना माफ करणार नाही. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि भाजपाला मतदान करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपामध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी, केशुभाई पटेल, वल्लभभाई कठेरिया यांच्यासारखे नेतृत्व होते तेव्हा पाटीदार समुदायाचे नेते भाजपाशी निष्ठावंत होते. पण, आता पक्षात असे लोक आहेत ज्यांनी आम्हाला शारीरिक यातना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
दोन दिवसांपूर्वी मला सुरत येथून एका श्रीमंत व्यक्तीचा फोन आला. त्याने मला सुरतमध्ये येऊन रॅली न घेण्याच्या बदल्यात पाच कोटी रुपयांची आॅफर दिली होती. पण मी ही आॅफर फेटाळली, असा दावा हार्दिक पटेल यांनी केला.