लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यात पंतप्रधानही बदल करू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या हातात काहीही नसून, केवळ जीएसटी काऊन्सिललाच ते अधिकार आहेत. त्यामुळे आंदोलन, संप करा, आम्हाला निवडणुकीत मत द्या अथवा नका देऊ, जीएसटीमध्ये बदल करता येणार नाही,’ असे केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो)च्या वतीने ‘जीएसटी नंतर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, ज्येष्ठ उद्योजक रसिकलाल धारिवाल, शोभा धारिवाल, कृष्णकुमार गोयल, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, अॅड. हितेश जैन, जितोचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव नरेंद्र छाजेड, विजयकांत कोठारी यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गोयल म्हणाले, ‘कोणताही बदल सहज होत नाही. करप्रणालीत बदल होत असताना काही काळ अडचणींचा सामना करावा लागेल. देशाची सद्य:स्थिती पाहून सर्वपक्षीय संमतीने ही कररचना आणली आहे. त्यात बदल करण्याचा अधिकार केवळ जीएसटी काऊन्सिलला आहे. केंद्र सरकारमधील केवळ अर्थमंत्री या काऊन्सिलमध्ये आहेत. तसेच सर्व राज्यांचे अर्थमंत्री सदस्य आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही बदल करण्याबाबतचा निर्णय घेवू शकत नाहीत. काऊन्सिलमध्ये सामूहिकपणे निर्णय घेतला जातो. आता जीएसटी स्वीकारायला हवा. या करप्रणालीत काळा बाजार करताच येणार नाही. संगणकप्रणालीमुळे बोगस व्यापारी लगेच काळ्या यादीत जातील. कररचना तसेच अंमलबजावणीत काही त्रुटी असल्या तरी डोक्याला बंदूक लावून त्या सुधारणार नाही. चर्चेतूनच मार्ग काढला जाईल.’ कृष्णकुमार गोयल, राजेंद्र गुगळे, वालचंद संचेती, सूर्यकांत पाठक, ब्रिजमोहन शर्मा यांनी जीएसटीबाबत विविध मते व्यक्त करीत अडचणी मांडल्या. काँग्रेस संभ्रमावस्थेत ‘जीएसटी’चे सर्वांकडून स्वागत होत असले तरी काही राजकीय पक्ष नाराज आहेत. जीएसटीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही १८ टक्केपेक्षा जास्त कर नको, असे म्हटले. काँग्रेस सध्या संभ्रमावस्थेत आहे. ही स्थिती कायम राहिल्यास आगामी निवडणुकीत मोठा विरोधी पक्ष राहील की नाही, हे सांगता येणार नाही.- पीयूष गोयल, केंद्रीय ऊजामंत्री
मत द्या किंवा देऊ नका, जीएसटीत बदल नाही
By admin | Published: July 08, 2017 3:14 AM