ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - गुजरातच्या विकास मॉडेलचे दाखले देत केंद्रात सत्ता मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॅगच्या अहवालाने जोरदार दणका दिला आहे. कॅगने मोदींच्या विकास मॉडेलवर ताशेरे ओढले असून कॅगने मोदींच्या विकास मॉडेलची चिरफाड केली हे बरेच झाले अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री असताना राबवलेल्या मॉ़डेलचे दाखले देत देशभरातही हेच मॉडेल राबवण्याचे आश्वासन दिले होते. मतदारही मोदींच्या गुजरात मॉडेलला भूलले व त्यांनी भाजपाला भरघोस मताधिक्याने सत्तेवर बसवले. मोदी सरकार सत्तेवर आल्याने जनतेचे अच्छे दिन आलेले नाही अशी टीका विरोधी पक्षांकडून होत असतानाच कॅगच्या अहवालाने गुजरात मॉ़डेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. २००९ -१ ० मध्ये गुजरातमध्ये वित्तीय तुट १५, ५१३ कोटींवर होती. मात्र २०१३ -१४ मध्ये हेच प्रमाण थेट १८,४२२ कोटी रुपयांवर पोहोचले असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. या शिवाय राज्यातील रस्ते प्रकल्पांचे काम विलंबाने होत असून राज्यातील पाणी वितरण व्यवस्थाही सदोष असल्याचे कॅगने नमूद केले आहे. राज्यातील सेक्स रेशिओचे प्रमाण ९२२ हून ९१९ आले आहे. शेतीच्या विकास दरातही गुजरातची कामगिरी फारशी चांगली नाही असे अहवालातून उघड झाले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, शिक्षणाचा अधिकार या महत्त्वाच्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे कॅगने नमूद केले. राज्याला व्हॅट करातून ३०० कोटींहून अधिक रुपये अद्याप वसूल करता आले नाही.
मोदींनी प्रशासकीय यंत्रणांना शिस्त लावली असे नेहमीच म्हटले जाते. पण कॅगने या दाव्याची पोलखोल केले नाही. विविध विभागांनी सादर केलेल्या बिलांमध्ये त्रुटी आढळल्या असून यावरुन सरकारचे विभागांवर नियंत्रण नसल्याचे दिसून असे अहवालात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे या अहवालाचे स्वागत करत मोदींना चिमटा काढला आहे.