नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता देशातील 200 शास्त्रज्ञांनीही मतदारांना आवाहन केलं आहे. आपल्या विरोधकास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन देशातील 200 वैज्ञानिकांनी केलंय. देशाच्या प्रमुख संस्थेमधील वैज्ञानिकांनी हे आवाहन केलं आहे. तसेच आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करुन मतदान करा, असेही त्यांनी म्हटले. मात्र, आपल्या आवाहनामध्ये कुठल्याही पक्षाचा उल्लेख या वैज्ञानिकांनी केला नाही.
विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 3 एप्रिल रोजी शास्त्रज्ञांकडून हस्ताक्षराद्वारे करण्यात आलेल्या आवाहनातून ही सूचना मांडण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षात निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. त्यामुळे याबाबतही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
इंस्टीट्यूट ऑफ मॅथमेटीकल सायन्सेस, चेन्नई येथील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सिताभ्रा सिन्हा यांनी 1799 मध्ये स्पॅनिश आर्टिस्ट फ्रांसिस्को गोया यांच्या छायाचित्राचा अहवाल देत म्हटले की, गोयाच्या शब्दात सांगायचे झाल्यास, जेव्हा चर्चा बंद होते आणि तर्क झोपी जाते, तेव्हा राक्षसाचा जन्म होतो. नॅशनल मेडिकल ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्समधील एक ख्यातनाम प्राध्यापक पार्थ मजदूमदार यांनी म्हटले की, एका शास्त्रज्ञाच्या नाते मला त्या लोकांपासून सावधान राहिले पाहिजे, जे विद्यार्थी आणि समाजाला विघातक बनवत आहेत.
पुण्यातील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चमधील प्राध्यापक सत्यजीत रथ म्हणाले की, शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचं धाडस दाखवलं, कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, शास्त्रज्ञांनीही याबाबत देशातील स्थिती वर्णन करताना, कुठल्याही पक्षाचे नाव न घेता मतदारांना आवाहन केलंय.