ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - पेन्शन खात्यातून पैसे काढण्यासाठी आधार कार्ड दाखवणे आवश्यक नसल्याचा निर्णय ईपीएफओच्या निवृत्तीवेतन निधी विभागाने दिला आहे. त्यामुळे कोट्यवधी पेन्शनधारकांची पेन्शन खात्यातून पैसे काढताना आधारकार्डच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
पेन्शन खात्यातून पैसे काढू इच्छिणाऱ्यांसाठी आधार कार्ड दाखवणे अनिवार्य करण्याचा निर्णय ईपीएफओने आधी घेतला होता. पण आता या खात्यातून पैसे काढण्यासाठी आधारकार्ड दाखवण्याची गरज नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या व्यक्तीचा सेवा कालावधी दहा वर्षांपेक्षा कमी आहे, असे कर्मचारी आपल्या दाव्यासाठी 10सी हा फॉर्म भरून आपल्या पेन्शन खात्यातून रक्कम काढू शकतात. मात्र 10 डी अर्ज देऊन खात्यातून रक्कम काढू इच्छिणाऱ्यांना आपल्या अर्जासोबत आधार कार्ड किंवा नोंदणीची पावती दाखवावी लागणार आहे.
त्याआधी जानेवारी महिन्यात पेन्शन खात्यांतून पैसे काढणाऱ्यांबाबत मोठा निर्णय जाहीर करताना ईपीएफओने पेन्शन खात्यातून पैसे काढणाताना आधार कार्ड अनिवार्य असल्याची घोषणा केली होती.