ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - पाणी वाचवा, पाण्याचा एक थेंबही वाया घालवू नका. पाणी वाचवणे आणि जंगलाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. मी प्रसारमाध्यमांना विनंती करीन की, त्यांनी पाणी वाचवण्यासाठी जनतेमध्ये जागरुकता निर्माण करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारच्या 'मन की बात' मध्ये बोलताना म्हणाले.
दर महिन्याच्या चौथ्या रविवारी पंतप्रधान मन की बात मधून देशवासियांना संबोधित करतात. दुष्काळाचा सामना करण्यासाठी अनेक राज्यांनी चांगले उपाय योजले, गुजरात आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग केला असे मोदींनी सांगितले.
दुष्काळग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली, सर्वांना एकत्र भेटण्याऐवजी मी प्रत्येकाची स्वतंत्र भेट घेतली असे मोदींनी सांगितले. आगामी रिओ ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील घटनांचाही आढावा घेतला. देशाच्या क्रीडा क्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने आहेत हे खरे आहे पण रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेल्या क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण आपण तयार केले पाहिजे असे मोदी म्हणाले. देशात फुटबॉलची लोकप्रियताही वाढत आहे असे मोदींनी सांगितले.
रोख रक्कमेचा वापर कसा कमी होईल यासाठी कॅशलेस सोसायटीच्या दिशेने जगाचा प्रवास सुरु आहे, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. कॅशलेस सोसायटीच्या संकल्पना यशस्वी ठरेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.