ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. चीनच्या मुद्यावर तुम्ही शांत का ? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या परदेश दौ-यावर असून राहुल गांधी यांनी त्यांच्या परराष्ट्र नीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. भारत आणि चीनमध्ये सध्या सर्व काही आलेबल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर कसं काय भाष्य केलं नाही यावरुन राहुल गांधींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सिक्किमच्या सीमेलगत असलेल्या डोकलाम येथे चीनने सुरू केलेल्या रस्ता बांधणीवरून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गेले सुमारे महिनाभर तणातणी सुरू आहे.
आणखी वाचा
Why is our Prime Minister silent on China?— Office of RG (@OfficeOfRG) July 7, 2017
16 जून रोजी चीनने डोकलाम येथे रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र आठ दिवसानंतर ही गोष्ट उघडकीस आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जूनला अमेरिका दौ-यावर गेल्यापासून फार कमी वेळा भारतात थांबले आहेत. पंतप्रधान मोदींनी चीनचा उल्लेख केला नाही असं नाही, मात्र त्यात त्यांनी कुठेही सीमारेषेवर सुरु असलेल्या तणावाचा उल्लेख केला नाही. जर्मनीत होत असलेल्या जी 20 शिखर परिषदेमध्ये चीनला पुर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोबतच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांना परिषदेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांनीदेखील भारताचं कौतुक करताना दहशतवादाविरोधात घेतलेली कठोर भूमिका आणि आर्थिक विकासात होत असलेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी 20 शिखर परिषदेसाठी जर्मनीतील हॅमबर्ग येथे आहेत. याआधी नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर होते. अमेरिका दौ-यावरुन परतल्यानंतर काही दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. त्यानंतर इस्त्रायल दौ-यावर गेले होते.
याआधी बुधवारीही राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता. एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले होते. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं होतं.