ऑनलाइन लोकमत -
मेरठ, दि. 18 - दाढी करा नाहीतर मी आत्महत्या करेन अशी अजब धमकी 36 वर्षीय अर्शद बहारुद्दीन यांना त्यांच्या पत्नीने दिली आहे. अर्शद बहारुद्दीन मुस्लिम असून पेश इमाम आहेत. त्यांनी जिल्हाधिका-यांकडे आपल्या पत्नीचं समुदेशन करण्याची विनंती केली आहे. आपल्या पत्नीने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं तर याला आपल्यालाच जबाबदार धरलं जाईल अशी भीती अर्शद बहारुद्दीन यांना वाटू लागली आहे.
अर्शद बहारुद्दीन यांनी जिल्हाधिका-यांकडे यासंबंधी तक्रार केली आहे. 'मी पेश इमाम असून इस्लामचा खरा समर्थक आहे. मी 2001 मध्ये सहानाशी विवाहबद्द झालो. लग्नानंतर लगेचच माझ्या पत्नीने मला दाढी काढून टाकण्याची मागणी केली. बॉलिवूडमधील अभिनेते सलमान खान, शाहरुख खान तिला प्रचंड आवडतात, त्यामुळे त्यांच्यासारखं मी दिसावं अशी तिची मागणी आहे. तिने स्मार्टफोन विकत घेतला असून दिवसभर परपुरषांशी गप्पा मारत असते. मी अनेकदा यावरुन नाराजी व्यक्त केली आहे' असं अर्शद बहारुद्दीन यांनी सांगितलं आहे.
'मी इमाम असल्याने दाढी ठेवणं मला गरजेचं असल्याचं पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या मागणीवर ठाम आहे. आम्हाला 4 मुलं आहेत, तरीही ती ऐकण्यास तयार नाही. तिच्या अती मोबाईल वापरामुळे मुलांवरही परिणाम होऊ शकतो. आणि त्यांनाही याची सवय लागू शकते यासाठी मी तिला अनेकदा मोबाईल वापर कमी करण्यास सांगितलं. तिच्या वागण्याने माझी चिडचिड होत आहे. मी जेव्हा तिला ओरडलो तेव्हा तिने रडण्यास सुरुवात केली आणि मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली', असंही अर्शद बहारुद्दीन यांनी पत्रात लिहिलं आहे.
ईदच्या दुस-या दिवशी अर्शद बहारुद्दीन यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अर्शद बहारुद्दीन वेळेत घरी आल्याने तिला वाचवलं. जिल्हाधिकारी दिनेश चंद्रा यांनी तक्रारीची प्रत पोलीस अधिक्षकांकडे पाठवली आहे.