नवी दिल्ली- संपुआ सरकारचा दहा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली 2014 साली केंद्रात नवे सरकार सत्तेत आले. गेल्या चार वर्षांमध्ये या सरकारच्या अनेक निर्णयांवर देश-विदेशात चर्चा झाली. अनेक निर्णयांवर कडाडून टीकाही झाली. तसेच काही निर्णय मागेही घ्यावे लागले. मात्र इतके असनही या सरकारच्या निर्णयांबद्दल अफवाही पसरवल्या गेल्या.
1) या सरकारने लाल किल्ला विकला अशी अफवा सोशल मीडियावर वायरल झाली होती. तसेच दालमिया भारत लिमिटेड या समुहाला या किल्ल्याचा ताबा दिला असून त्या कंपनीने सरकारला 25 कोटी रुपये दिले अशी माहिती सर्वत्र पसरवली गेली होती. मात्र असे काहीही झाले नसून अॅडॉप्ट ए हेरिटेज योजनेनुसार दालमिया भारत कंपनीशी सरकारने करार केला आहे. यानुसार लालकिल्ल्याची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणासाठी हा समूह प्रत्येक वर्षी 5 कोटी खर्च करेल.
2) गुजरात निवडणुकीच्यावेळेस नोटाबंदीप्रमाणे नरेंद्र मोदी सरकार चेकबंदी करेल अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्याबाबत सोशल मीडियावर माहितीही पसरवली गेली. डिजिटल व्यवहार वाढावेत यासाठी सरकारने ही नोटबंदी केली असे सांगण्यात येत होते. मात्र असे काहीही करण्याचा मनोदय नसल्याचे सरकारने सांगितले. चेकमुळे व्यवहार पारदर्शी होतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे चेकबंदी होणार नाही असे सरकारने स्पष्ट केले.
3) नुकताच काही राज्यांमध्ये रोख रकमेचा अचानक तुटवडा जाणवू लागला होता. त्यावेळेस सरकराने 2000 च्या नोटा बंद करण्याची तयारी चालवली आहे अशा बातम्या पसरवल्या गेल्या होत्या. मात्र अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दोन हजारच्या नोटा बंद करण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितले. बाजारात मोठ्या प्रमाणात 2 हजारांच्या नोटा उपलब्ध असल्याने या नोटा थांबवण्यात आल्या होत्या.
4) नव्या नोटांमध्ये सरकारने नॅनो चिप्स घातल्या आहेत अशीही अफवा पसरवली गेली होती. पैसै लपवून ठेवणाऱ्या लोकांना या चिपमुळे पकडणे सोपे होईल असेही काही लोकांनी सांगतिले होते. मात्र सरकारने तसेच दस्तुरखुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आणि चिपची अफवा कोणीतरी मुद्दाम पसरवल्याचे सिद्ध झाले.
5) या सर्व अफवांमध्ये आणखी एका विचित्र अफवेने गदारोळ उडाला होता. तो म्हणजे हे सरकार सोनं जप्त करणार असून सोन्याला लोखंड म्हणून घोषित करेल. मात्र सरकारने शेवटी जाहिरात प्रसिद्ध करुन सरकार असे काहीही करणार नसल्याचे स्पष्ट केले.
6) हे सरकार 5 आणि 10 ची नाणी बंद करणार असल्याचीही अफवा पसरवली गेली होती. मात्र असे काहीही झाले नाही.
7) सरकारने 6 बँकांच्या कार्डावर बंदी घातल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. या बँकांच्या कार्डावरुन तिकीट घेतल्यास पेमेंट स्वीकारले जाणार नाही असेही त्यात नमूद केले होते. मात्र असे काहीही नव्हते. सरकारने कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डावर बंदी घातली नाही.
8) या सरकारच्या एफआरडीआयच्याविधेयकाबाबतीतही खओट्या बातम्या पसरल्या होत्या. बँकांमध्ये जमा असलेला पैसा बुडण्याची शक्यता निर्माण झाली असून बँका तुमच्या परवानगीविना तुमचा पैसा वापरु शकतील अशी माहिती पसरवली गेली. सरकारने अशी कोणतीही तरतूद या विधेयकात नसल्याचे सांगून लोकांचे पैसे सुरक्षित असल्याचे स्पष्टिकरण दिले.
9) रेल्वे परीक्षेसाठी सरकारने 500 रुपये प्रतीव्यक्ती घेतल्याची माहिती सर्वत्र पसरवली गेली. मात्र रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी जे लोक परीक्षा देतील त्यांना 500 रुपयांतील 400 रुपये परत मिळणार आहेत. कमी फी असल्यामुळे हजारो विद्यार्थी अर्ज भरतात मात्र परीक्षेला येत नाहीत. सरकार या परिक्षांवर मोठा खर्च करत असतात त्यामुळे तो कमी करण्यासाठी फी वाढवल्याचे व परीक्षा देणाऱ्यांना त्यातील 400 रुपये परत देण्याचे ठरवल्याचे गोयल यांनी सांगितले.
10) नोटाबंदीच्या काळामध्ये सर्वाधिक अफवा पसरवल्या गेल्या होत्या. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सरकारव आयआरबीकडे आल्या असून त्या मोजण्याची यंत्रे खराब होत आहेत. मात्र आयआरबीने नोटा मोजण्यासाठी यंत्रे वापरलीच नाहीत असे स्पष्ट केले. त्यासाठी 66 करन्सी मशीन वापरले गेले होते.
11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना सुरु केलीय मात्र या योजनेबाबतीत अनेक खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. या योजनेअंतर्गत सरकार 2 लाखांची मदत करणार असल्याची अफवा पसरवली गेली होती. मात्र असे काहीही त्यामध्ये करण्यात येणार नव्हते.