चेन्नई- तामिळनाडूतील पांबन बेटाला जोडणाऱ्या सागरी पुलाचे चित्र तुम्ही पाहिले असेल. जहाजं आणि बोटींसाठी हा पूल मधोमध उघडला जाऊन त्यांना वाट करुन देतो आणि पुन्हा एकसारखा होतो. या पुलावरुन रेल्वेची वाहतूक केली जाते. आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम आयआयटी मद्रासच्या मदतीने करण्यात येणार आहे.
1) 14 फेब्रुवारी 1914 रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा पूल 143 कमानींवर उभा असून त्याची लांबी 2 किलोमीटर इतकी आहे. पांबन बेट आणि भारताची मुख्य भूमी यांना जोडण्याचं मुख्य काम हा पूल करतो. मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतूची लांबी 2.3 किमी इतकी असून त्यानंतर या पुलाचाच नंबर लागतो.2) जर्मन अभियंता शेर्झेरने या पुलाचे डिझाइन तयार केले होते. हा पूल उघडल्यावर त्याखालून जहाजे, बोटी जाऊ शकतात. 1988 पर्यंत रामेश्वरमला जाण्यासाठी या पुलाचा एकमेव मार्ग उपलब्ध होता. मात्र नंतर या पुलाला समांतर रस्त्याचा पूल तयार झाला.3) 1964 साली आलेल्या चक्रीवादळामुळे पांबन बेटाचे धनुषकोडीचे मोठे नुकसान झाले मात्र या वादळातही हा पूल टिकून राहिला. 46 दिवसांनंतंर मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या प्रयत्नांमुळे तो वापरण्यास खुला झाला.4) युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये या पुलाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुलाचे मधोमध दोन भाग होऊन त्याखालून जहाज जाणे हे लोकांना आजवर आश्चर्यचकीत करत आले आहे.5) समुद्राच्या पातळीपासून हा पूल 41 फूट उंचीवर असून 2,065 मी लांब आहे. त्याचे वरखाली करता येतील असे दोन भाग असून प्रत्येक भागाचे 415 टन वजन आहे.
6) पांबन पूल बांधण्याची कल्पना 1870 साली ब्रिटिश प्रशासनाने मांडली होती. श्रीलंका (तेव्हाचे सिलोन) बरोबर व्यापार वाढविण्यासाठी या पुलाचा उपयोग त्यांना करायचा होता. मात्र प्रत्यक्षात बांधकाम सुरु होण्यासाठी 1911 सालचा ऑगस्ट महिना उजाडला व 24 फेब्रुवारी 1914 रोजी तो वापरात आला.7) मुख्यभूमीवरील मंडपम आणि पांबन ही स्थानके हा पूल जोडतो. या पूलावरून फक्त मीटर गेज रेल्वे जाऊ शकत असे मात्र 12 ऑगस्ट 2007 पासून ब्रॉड गेजची सोय सुरु झाली. पांबनमधून रेल्वेचे दोन मार्ग होतात. एक मार्ग रामेश्वरमला जातो तर दुसरा धनुषकोडीला जातो.8) आजवर या पुलासंदर्भात दोन अपघात झाले आहेत. 1964च्या चक्रीवादळामुळे रेल्वेला अपघात झाला तर जानेवारी 2013मध्ये एक बार्जचा पुलाजवळ अडकून अपघात झाला.9) आता या पुलाचे दोन्ही भाग दुरुस्त केले जाणार असून आयआयटी मद्रास त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत करणार आहे.10) रामेश्वरम या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आजवर या पुलाने लाखो भाविकांना मदत केली आहे.