मुंबई- उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विधानानंतर भारताच्या राष्ट्रीय चळवळीतील ख्रिश्चन समुदायाच्या योगदानाबद्दल चर्चा सुरु झाली आहे. केरळमधील ख्रिश्चन धर्माचे अभ्यासक ग्रेगर राजन कोल्लानूर यांनी भारतातील ख्रिश्चन समुदायाच्या इतिहासाची अभ्यास केला आहे. यासंदर्भात त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. यापैकीच इंडियन ख्रिश्चॅनिटी अँड नॅशनल मूव्हमेंटस् या शोधनिबंधात त्यांनी ख्रिश्चन समुदायाच्या योगदानाची माहिती प्रसिद्ध केली आहे.
1857 साली उठाव झाल्यानंतर भारतीय राष्ट्रवादाचा उगम झाला आणि त्यावेळेपासूनच ख्रिश्चनांचा राष्ट्रीय चळवळीत सहभाग सुरु झाला असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. त्यावेळेस स्थानिक भारतीयांना आपली मते मांडण्यासाठी व्यासपीठ असावे, तसेच भारतीयांना प्रशासनात संधी मिळावी असे अॅलन ऑक्टेव्हीयन ह्यूम यांना वाटे. त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेतला. 1887 साली काँग्रेसच्या मद्रास येथे झालेल्या अधिवेशनात 607 अभ्यागतांपैकी 35 अभ्यागत ख्रिश्चन होते. भारतातील ख्रिश्चन समाजाचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसमधील अभ्यागतांमध्ये त्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समजते असे ग्रेगर म्हणतात. त्या काळामध्ये काँग्रेसमधील ख्रिश्चन अभ्यागतांमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांची नावे सांगताना ग्रेगर यांनी मद्रासचे प्रसिद्ध वकिल बॅ. आर.एस.एन सुब्रमण्य, बंगालचे कालीचरण बॅनर्जी, लाहोरचे जी.जी. नाथ, मद्रास प्रांतातील पीटर पॉल पिल्ले, ओरिसाचे प्रसिद्ध वकील मधुसुदन दास यांचा उल्लेख करतात. ह्यूम यांच्याप्रमाणे जॉर्ज यूल यांनीही काँग्रेसमध्ये सहभाग घेतला होता. ते चौथ्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर डॉ. अॅनी बेझंट यांनीही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले.
त्यानंतर पंडिता रमाबाईंनीही 1889 साली काँग्रेस अधिवेशनात सहभाग घेतला होता. महिलांच्या विविध प्रश्नांवर पंडिता रमाबाईंनी मते मांडली होती. समाजाची टीका, शेरे, टोमणे सहन करुन त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले होते. 'संध्या' हे राष्ट्रवादी विचारांचे नियतकालिक चालवणारे ब्रह्मबंदाब उपाध्या यांनी स्वदेशी चळवळीचा पुरस्कार आपल्या लेखनातून केला होता. पूर्ण स्वराज्याला पाठिंबा देताना ते लिहितात, ''आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य हवे आहे. परकीय फिरंगी सत्तेचे कोणतेही अंश शिल्लक राहिले असताना देशाचा विकास होऊ शकणार नाही. फिरंग्यांनी देऊ केलेल्या अधिकारांवर आपण थुंकले पाहिजे व त्यांना नाकारले पाहिजे. आपण आपल्या (देशाच्या) मुक्तीसाठी काम केले पाहिजे.''
पंडिता रमाबाईंबरोबर महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदायातील महत्त्वाचे नाव आणि कवी नारायण वामन टिळक यांचेही उदाहरण ग्रेगर देतात. (ना. वा. टिळक यांनी ख्रिस्तायनबरोबर प्रियकर हिंदीस्तान ही कविता लिहिली आहे.) असे असले तरी पाश्चात्य म्हणजे युरोपातील व अमेरिकेतील ख्रिश्चन नेत्यांना, मिशनऱ्यांना ख्रिश्चनांनी भारतीय हिंदूंबरोबर काँग्रेसमध्ये जाणं पसंत पडले नव्हते. बहुतांश पाश्चात्य ख्रिश्चन हे ब्रिटिश सत्तेच्या बाजूने होते. त्यामुळे 1890 नंतर ख्रिश्चनांचा चळवळीतील सहभाग थोडा कमी झाला. केरळमध्ये यूथ ख्रिश्चन कौन्सीलचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नेहमीच पाठिंबा राहिला तसेच केरळमधील के. सी. कुमारप्पा यांनी गांधीजींच्या चळवळीत सहभाग घेतला त्यांच्याबरोबर जॉर्ज जोसेफ, एस. के. जॉर्ज गांधीजींनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीत योगदान दिले होते. एस. डी. दत्ता आणि के. टी. पॉल हे ख्रिश्चन नेते गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. अशा प्रकारे ग्रेगर कोल्लानूर यांनी विविध उदाहरणांच्या मदतीने भारतीय ख्रिश्चनांचे विविध चळवळींमधील योगदान सांगितले आहे.
सर्वच स्तरांतून गोपाळ शेट्टी यांच्यावर टीका झाल्यानंतर शेट्टी यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे असे विधान केले आहे. आपल्याला बोलण्याचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपण संसद सदस्यात्वाचा राजीनामा देण्याच्या विचारात आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे.