मुंबई- स्वतंत्र भारतात मांडल्या गेलेल्या महत्त्वाच्या अर्थसंकल्पामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 साली मांडलेल्या अर्थसंकल्पाचे नाव घेतले जाते. अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास सर्वज्ञात आहे. परंतु त्यांनी या तीन पदांशिवाय विविध पदांवर काम केले आहे. कदाचित इतक्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे ते एकमेव पंतप्रधान असावेत.
1971-72 या कालावधीमध्ये डॉ. सिंग हे परराष्ट्र व्यापार मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार होते. त्यानंतर अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार झाले. 1972 ते 1976 अशी चार वर्षे ते या पदावरती होते. त्यानंतर 1976 साली जवाहरलाल नेहरु विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1976 साली ते रिझर्व्ह बँकेचे संचालक झाले. तसेच इंड्रस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकेचेही ते संचालक झाले. या दोन्ही पदांवरती त्यांनी 1976 ते 80 या चार वर्षांसाठी काम पाहिले. त्यानंतर त्यांची एशियन डेव्हलपमेंट या मनिलास्थित बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये निवड झाली. 1977 ते 1980 या काळासाठी त्यांची केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव म्हणून निवड झाली.
1982 ते 1985 या तीन वर्षांसाठी ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले. राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये 1985 ते 87 या कालवधीमध्ये ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर जीनिव्हा स्थित साऊथ कमिशनमध्ये त्यांनी सेक्रेटरी जनरल या पदावर 1987-1990 अशा काळासाठी काम केले. 1990-91 या एका वर्षासाठी ते पंतप्रधानांचे अर्थविषयक सल्लागार झाले. तर 15 मार्च ते 20 जून 1991 अशा अल्पकाळासाठी ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष होते. 21 जून रोजी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कार्यकाळात 1996 पर्यंत ते अर्थमंत्री राहिले. भारतीय अर्थव्यवस्थेची रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा मार्गावर आणण्यासाठी त्यांनी या काळामध्ये प्रयत्न केले होते. त्यानंतर 1998 ते 2004 अशी सहा वर्षे ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. केंद्रातील रालोआ सरकारनंतर आलेल्या संपुआ 1 आणि 2 अशा दोन सरकारमध्ये पंतप्रधानपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2014 पर्यंत ते पंतप्रधान होते