ऑनलाइन लोकमत
राष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.
राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.
राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
हा व्हिडीयो प्रियांका चोप्राने 26 जानेवारी रोजी शेअर केला होता. हाच व्हिडीयो अनेक मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येत आहे. त्यात एक शक्यता आहे की हे गंगाजलची जाहिरात करणारे राष्ट्रगीत दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्सही चांगलीच किंमत वसूल करत असणार.
गंगाजलमध्ये पोलीस सुपरिटेंडेंटच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा झळकत असून प्रकाश झांचं दिग्दर्शन आहे. हा विषय अत्यंत चांगला आहे यात काही वाद नाही, परंतु हा व्हिडीयो प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात दाखवलाय की चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी हा प्रश्न शिल्लक राहतोच.
तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रगीताचा असा सिनेमाच्या जाहिरातीसाठी वापर करणं योग्य आहे?
तुमचंही मत वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे नक्की शेअर करा...