नवी दिल्ली : सोशल मीडियावर रिल्स बनवून अनेक जण प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन रिल्स बनविणाऱ्या हौशी लोकांचीही कमी नाही. मात्र, अशी प्रेरणा अंगलट येऊ शकते. भारत जोडो यात्रेत केजीएफ चित्रपटाच्या संगीताची नक्कल केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांवर कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही रिल्समध्ये असा प्रकार केल्यास तुमच्यावरही असाच गुन्हा दाखल होऊ शकतो.
कॉपीराईट कायदा काय?कॉपीराईट संरक्षण करण्यासाठी ‘कॉपीराईट ॲक्ट १९५७’ हा कायदा आहे. अस्सल कामांची नक्कल करता येत नाही. प्रताधिकाराचा हक्क संबंधित कंटेंटच्या निर्मात्यास असतो; पण, निर्मात्याच्या कर्मचाऱ्यासही हा हक्क मिळू शकतो. एखादा कंटेंट तुम्ही स्वत: निर्माण केला असेल अथवा त्याचे हक्क असतील तरच तुम्ही या कायद्याचा वापर करू शकता. कंटेंटच्या मालकीचे योग्य दस्तऐवज त्यासाठी तुमच्याकडे हवेत.
काय आहे कॉपीराईट?स्थावर, जंगम मालमत्तेप्रमाणेच बौद्धिक संपदाही वैयक्तिक मालकीची असते. तिची चोरी केल्यास कॉपीराईट उल्लंघनाचा गुन्हा होतो. उदा. : एखाद्या लोकप्रिय अल्बममधील गाणी दुसरा कोणी वापरत असेल, तर ती एक प्रकारची चोरीच असते. येथे कॉपीराईट उल्लंघनाचा कायदा लागू होतो. काँग्रेसने केजीएफचे संगीत आपल्या प्रचार व्हिडिओत वापरले होते. त्यासाठी त्यांनी संगीत निर्मिती करणाऱ्याची परवानगी घेतली नव्हती; त्यामुळे येथे थेट कॉपीराईट उल्लंघन झाले आहे. कुठलेही लेखन, मजकूर, संगीत आणि चित्रपट यांवर मालकाचा कायदेशीर अधिकार असतो. त्यांचा वैयक्तिक वापर केला जाऊ शकतो; पण व्यावसायिक वापर केल्यास कॉपीराईटचे उल्लंघन होते.
सोशल मीडियाचा वापर कसा करणार ? इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या समाजमाध्यमांवर रिल्स आणि शॉर्ट्समध्ये संगीत देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म काही इनबिल्ट म्युझिक कॅटलॉग देतात. त्याचे अधिकार या प्लॅटफॉर्म्सनी खरेदी केलेले असतात. ते वापरल्यास प्रताधिकाराचे उल्लंघन होणार नाही.या प्लॅटफॉर्म्सनी दिलेल्या कॅटलॉगबाहेरील संगीत अथवा अन्य कंटेंट तुम्ही वापरल्यास प्रताधिकाराचे उल्लंघन होईल.