मुंबई- मला बायको म्हणून गोरी मुलगीच पाहिजे असं स्वतः काळे असणारे मुलं हट्ट धरतात तेव्हा आपल्या या गोऱ्या कातडीच्या वेडावरती विचार करण्याची वेळ आली आहे असं म्हणावं लागेल. गोऱ्या पत्नीबरोबर 'शोभावा' म्हणून मी सुद्धा गोराच दिसलो पाहिजे अशी धडपड मुलांनी सुरु केली आहे. पण हा गोरेपणाचा ध्यास अचानक का वाढीला लागला ? त्यामागे फेअरनेस कंपन्यांचा काही हात आहे का? जे गोरं तेच चांगलं असा समज कोणी मुद्दाम पसरवत आहे का? या प्रश्नांचा आपल्या सर्वांना विचार करावा लागेल. गेल्या दोन दशकांमध्ये आपल्या वागण्यात इतका आमूलाग्र बदल का झाला आहे यावर चर्चा व्हायला हवी.
पूर्वी महिन्यातल्या एका रविवारी घरातल्या चौकात एक पाट घालत. त्यावर आजोबा, मग बाबांचे केस कापून दाढी झाली की एकेका पोराने निमूट बसायचं आणि केस कापून घ्यायचे. हे केस कापताना आई-आजी, आजोबा हे सगळे चारही बाजूंनी तुमचं निरीक्षण करणार. जरा कानावर केस आले की ते कापून टाकायचे. शाळेत गुरुजींचं लक्ष फक्त शिकवण्याकडे नाही तर पोरांच्या कपडे, केस, नखांकडेसुद्धा असायचं. केस वाढलेलं पोरं दिसलं की त्याची कंबख्ती भरलीच. काय रे मवाली आहेस का, असं म्हणून आतपर्यंत कळ जाईल असे त्याचे केस ओढले जायचे. म्हणजे तो पोरगा दुसऱ्या दिवशी गुपचूप केस कापूनच येतो. पोरांना स्टाइल करण्यासारखी एकमेव संधी होती ती म्हणजे केसांची. पण तीही करता येत नसे. ‘बारीक कापा' हा सगळ्यांचा एकमेव 'कट' असे.
मात्र हे लक्ष फक्त पोरांवरच असे असं नाही ते मुलींवरही असे. बाहेर जातेस तर ओढणी घेऊन जा, टिकली लाव. कपाळी गंध लाव अशा ऑर्डरी सुटायच्या. वेणी घालताना कोण्या पोरीने केसांचा फुगा डोक्यावर ठेवलाच तर तिच्यावर सगळं घर तुटून पडायचं. पण मुलींना थोडीशी सूट मिळे. पावडर, कुंकू, काजळ, तेलं, टिकल्या, केसांच्या पिना, कानातलं, नाकात चमकी वगैरे नटायला परवानगी असे. मुलांचं तसं नव्हतं. ‘माझे केस, कपडे कसे असावेत याचा निर्णय मी घेईन’, अशी वाक्य उच्चारण्याची धमकच काय तसा विचारही करणं तरण्या पोरांना अवघड. त्यांचे कपडे, केस म्हणजे आजोबांची-बाबांची छोटी आवृत्ती. कुतूहल म्हणून जरी एखाद्या लहानग्या पोराने पावडर लावली किंवा नेलपॉलिश लावलंच तर त्याची पाठ लाल होईपर्यंत घरातले हात साफ करून घ्यायचे. असं नटायला मुलगी आहेस का असं म्हणत ओरडणारे, चिडवणारे, नातलगांचे, मित्रांचे, मास्तरांचे आवाज कानात घुमायचे.
पण दिवस बदलले वगैरे. खाण्या-पिण्याच्या, वागण्या-बोलण्याच्या सवयी बदलल्या. राहणीमान बदलल्यावर आपणही सुंदर, प्रेझेण्टेबल दिसायला हवं असं स्त्री-पुरुष दोघांना वाटायला लागलं. किंवा त्यांना तशी जाणीव करून देण्याची व्यवस्था बाजारपेठेनं निर्माण केली. नटण्यामुरडण्याच्या सवयींमध्ये मुलींनी पटकन बदल स्वीकारले. दुधाची साय, डाळीचं पीठ जाऊन तिथं त्या गोरं होण्याच्या क्रीम वापरू लागल्या. शिकेकाई-रिठ्याच्या जागी शॅम्पू आले. गोरं होण्यासाठी अनंत गोष्टी बाजारपेठेनं मुलींच्या जगात ओतल्या.
आता मुलांनी त्याच्या पुढे एक पाऊल टाकलं आहे. तरुण मुलांची. पाटावर किंवा लाकडी खुर्चीत ताठ बसून केस कापून घेणारी मुलं ‘मोठी’ झाली होती. बाजारपेठेचं लक्षही पुरुषांच्या सौंदर्यउत्पादनांकडे जाऊ लागलं. (पुरुष आणि सौंदर्य हे शब्द एकमेकांच्या जवळ आले तो हाच काळ.) त्यापूर्वी दाढीचा साबण आणि अत्तर या दोनच वस्तू पुरुष वापरत असत. पण गोरेपणाचा हव्यास समाजात होताच. गोरीच बायको हवी असा अट्टाहास धरणारे हेच तरुण. तो अट्टाहास किंवा गोरं नसण्याचा न्यूनगंड म्हणा बाजारपेठेनं तरुण मुलांच्या मनातही अचूक रुजवला. तसंही एखादी व्यक्ती दिसायला चांगली असणं म्हणजे गोरी असणं असाच आपल्याकडे एक खुळचट भ्रम. मुली त्याला बळी पडलेल्या होत्याच, मुलंही त्याला बळी पडली.
रंग गोरा नाही तर ना सही, गोरं होणं शक्य नाही तर किमान थोडं उजळ तरी दिसलं पाहिजे असा विचार पुरुषांच्या मनात येऊ लागलाच. मग भीत भीत त्यांनी पावडरीच्या डब्याला हात लावला. पावडर लावली. मग भीड चेपल्यावर जाहिरातीत पाहिल्यानुसार डोक्याला आता शॅम्पू लावला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. शॅम्पू लावायचा तर मग थोडे केसही असले पाहिजेत डोक्यावर, म्हणून थोडी जास्त सूट घेऊन केसांचा आकार लांबला. मग त्याचीही थोडी स्टाइल केली गेली. जुने पैलवान कट गेले आणि वेगवेगळे कट पुरुषांसाठी आले. पुरुषांचे हेअरकटही कल्पना नव्याने वर आली. हे कट शिकवायला सलमान, शाहरूख सिनेमात होतेच.
थोडे अधिक पैसे खिशात आल्यावर पुरुषांना जाणवायला लागलं. नुसत्या पावडरीने काही आपण हवे तितके उजळ दिसत नाही. आता क्रीम लावायला हवं. फेअर अॅण्ड ब्यूटीच्या मार्गावर पुरुषांसाठी फेअर अॅण्ड हॅण्डसम अशी घोषणा करत क्रीमच्या कंपन्या टीव्हीवर आल्या. मग पाठोपाठ त्या क्रीमच्या डब्या, बाटल्या घरी आल्या. बायकोबरोबर किंवा आई-बहिणीबरोबर मोठ्या दुकानात शॉपिंग करताना तेल, साबणांबरोबर अशा क्रीमच्या डब्या हळूच ट्रॉलीत पडू लागल्या.
कदाचित आजवरच्या इतिहासात पुरुषांनी स्वत:ची इतकी कधीच काळजी घेतली नसावी इतक्या वेगाने ते पावडरी, शॅम्पू, क्रीमचे डबे विकत घेऊ लागले. दाढीचे साबण जाऊन क्रीम आले त्याचा तयार फोम मिळू लागला. आफ्टरशेव आले. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी जे जे करतात ते करण्याची सर्व उत्पादने आणि प्रक्रिया पुरुषांसाठीही तयार झाल्या. जेंट्स सलून, फक्त लेडिजसाठी अशा पाट्या असणारी दुकानं सगळीकडे आली. आता फॅमिली युनिसेक्स सलूनही सुरू झाली आहेत. पुरुषांनीही केस, दाढी यात बदल केले. मिशांचे आकार बदलले किंवा त्या पूर्ण गेल्याच. भुवया कोरणं, नखं कापणं, वॅक्सिंग हेसुद्धा शहरात सहज दिसू लागलं. आठवडाभर कामाच्या, प्रवासाच्या रगाड्यात पिचलेल्या माना आणि पाठींना रविवारी मसाजची गरज भासायला लागली. मसाज करणा-या लोकांचीही संख्या सगळीकडे वाढली. प्रत्येक महिन्याला येणाऱ्या नव्या क्रीमला मेल्स ब्यूटी किटमध्ये जागा मिळायला लागली.
एकूण ‘मेट्रोसेक्शुअल’ पुरुषाचं एक चित्र माध्यमं, बाजारपेठा यांनी मांडलं. रुजवलं. आणि पार खेड्यापाड्यात पोहचवलं. जे गोरं ते सुंदर अशी आपण करून घेतलेली समजूत सौंदर्य उत्पादकांनी वाढवली आणि दुर्देव म्हणजे अजूनही आपण त्यालाच बळी पडतो आहोत.
गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील स्कीन केअर उद्योगात वायूवेगाने वाढ झाली आहे. साधारणत: ५ हजार कोटींची उलाढाल या उद्योगात होत आहे. पाच वर्षांचा विचार केला तर त्यामध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे दिसतं. यामध्ये सर्वात जास्त वाटा डिओडरंट आणि शेव्हिंग प्रॉडक्ट्सचा आहे. फेअरनेस क्रीमचा व्यवसाय त्यामध्ये ४०० कोटी इतका आहे. मग त्यात महिलांप्रमाणे 'अँटी एजिंग' म्हणजे सुरकुत्या दिसू नयेत सदाहरित वनांप्रमाणं सदा चेहऱ्यावर तुकतुकी दिसावी म्हणून आलेल्या क्रीमचाही समावेश आहे. तेलकट चेहऱ्याच्या मुलांना 'ऑइल कंट्रोल' आणि कोरड्या त्वचेच्या पोरांना ‘फॉर ड्राय स्कीन' असं लिहिलेले डबे तयार आहेत. कोणाला आता थोड्या वेळात (आणि थोड्या वेळासाठी) गोरं दिसायचं असेल तर मग 'फॉर इंस्टंट फेअरनेस' लिहिलेली डबी उचलायची. इंग्रज गेल्यावरती गोरे लोक खरे सुंदर अशी कल्पना आपण अजूनही आपल्या मनात कायम कोरून ठेवली आहे. सिनेमातले हिरोसुद्धा गोरे असणं म्हणजे हॅण्डसम अशी व्याख्या करून देतात. मग त्यांचं अनुकरण केलं जातं. उजळ दिसायच्या धडपडीमुळंच भारतातील पुरुषांच्या सौंदर्य उत्पादनांचा बाजार आज वेगाने वाढत आहे.