नवी दिल्ली, दि. 18 - तुम्हाला ताजमहाल नष्ट करायचा आहे का ? असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. उत्तर प्रदेशातील मथुरापासून ते दिल्लीपर्यंत अतिरिक्त रेल्वे ट्रॅक उभारण्यासाठी 450 झाडांची कत्तल करण्याची परवानगी मागणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत हा प्रश्न विचारला आहे. साक्षात सौंदर्याचे प्रतीक असलेला आग्रा येथील शुभ्र संगमरवरी ताजमहाल म्हणजे जगातील एक आश्चर्यच मानले जाते.
'ताजमहाल एक जगप्रसिद्ध वास्तू आहे, आणि तुम्हाला ती नष्ट करायची आहे का ? ताजमहालचे आत्ताचे फोटो पाहिलेत का ? इंटरनेटवर जा आणि पहा ?', असा प्रश्नांचा भडिमार करत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरलं. न्यायाधीस मदन लोकूर आणि दिपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. 'जर तुमची तशी इच्छा असेल, तर मग न्यायालयात तसा अर्ज करा आणि सरळ सरळ आम्हाला ताजमहाल नष्ट करायचा आहे असं सागून टाका', असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
दिल्ली ते मथुरादरम्यान 80 किमी लांब अतिरिक्त रेल्वे ट्रॅक उभा करण्यासाठी 450 झाडांची कत्तल करण्याची मंजुरी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. ट्रेनची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अतिरिक्च रेल्वे ट्रॅकची गरज असल्याचं याचिकेत सांगण्यात आलं आहे. न्यायालयाने पुढील महिन्यात याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ताजमहाल मकबरा की शिवमंदिर, सरकारला विचारला प्रश्नजगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असणारे ताजमहाल मकबरा आहे की प्राचीन शिवमंदिर? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगानं (CIC) सरकारला विचारला आहे. ताजमहाल संदर्भात माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या आधिकारांतर्गत एक याचिका आयोगाकडे करण्यात आली होती. याच मुद्द्यावर केंद्रीय माहिती आयोगानं सांस्कृतिक मंत्रालयाचं मत विचारलं होतं. त्याचप्रमाणे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणलाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
संगमरवरनं बनलेलं जगप्रसिद्ध ताजमहाल हे शहाजान यांनी बनवलेला मकबरा आहे की राजा मानसिंह या राजपूत राजानं बनवलेला आणि मुगल शासकाला भेट दिलेलं शिवालय आहे? असा प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाचे आयुक्त श्रीधर आचार्यालू यांनी विचारला होता.
ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे सुंदर शुभ्र संगमरवरात स्मारक उभारले. ताज महालाचे बांधकाम इ.स. १६५३ मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहौरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २०,००० कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताज महाल ही वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. युनेस्कोने ताज महाल या वास्तूला इ.स. १९८३ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. प्रतिवर्षी सुमारे तीस लक्ष (३०,००,०००) पर्यटक ताज महालाला भेट देतात.