आता एफआयआरसाठी आंदोलने करायची का? विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 06:28 AM2024-08-22T06:28:41+5:302024-08-22T06:29:20+5:30
या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कोलकाता : बदलापूर येथे दोन बालिकांवर अत्याचार झाला. त्याप्रकरणी जनता रस्त्यावर आल्यानंतरच आरोपींविरोधात कारवाईला सुरुवात झाली. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार होत असल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत. आता एखाद्याप्रकरणी एफआयआर दाखल होण्यासाठीदेखील आंदोलने करावी लागणार आहेत का? असा सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
या राज्यांमध्ये न्याय देण्याऐवजी गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न होताना दिसतात. महिला व दुर्बल गटांतील लोकांवर अधिक प्रमाणात अत्याचार होत आहेत. या स्थितीबाबत केंद्र, सर्व राज्यांची सरकारे, सर्व राजकीय पक्षांनी विचारमंथन करणे आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
कोलकाता घटनेप्रकरणी तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी निलंबित
संतप्त जमावाने कोलकात्यातील आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेल्या आठवड्यात घुसून खूप नासधूस केली होती. त्या प्रकरणी तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
डॉक्टरनी काढला मोर्चा
डॉक्टरवरील बलात्कार, हत्येच्या निषेधार्थ तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करावी, या मागणीसाठी पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांनी कोलकाता येथे मोर्चा काढला.
डॉक्टरशी संबंधित प्रकरणाचा सीबीआयने जलदगतीने तपास करावा व आरोपीला अटक करावी, अशी मोर्चेकऱ्यांनी मागणी केली.
जंतरमंतरवर निदर्शने
निवासी डॉक्टरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे बेमुदत संपाच्या दहाव्या दिवशीही निदर्शने केली.
आमच्या कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना योग्य सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. एम्सने संकुलातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याकरिता व उपाययोजनेसाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. महिला डाॅक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ ‘आप’च्या महिला आघाडीने राजघाट येथे महात्मा गांधी यांच्या स्मारकानजीक बुधवारी निदर्शने केली.