रायबरेली : पत्नीसह दोन मुलांचा खून करून नंतर डॉक्टरने आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लालगंज येथील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी येथील सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडला. दोन दिवसांपासून सदर कुटुंब राहात असलेली खोली बंद होती. त्यामुळे काल पोलिसांकडून दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. अरुण सिंह (वय ४५ वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव असून मृतांमध्ये पत्नी अर्चना सिंह, मुलगी अदिवा (वय १२ वर्ष) आणि मुलगा आरव (वय ४ वर्ष) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नेत्रतज्ज्ञ असलेले डॉ. अरुण सिंह हे मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी परिसरातील रुग्णालयात डीएमए पदावर कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबासह सरकारी निवासस्थानी वास्तव्यास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून सिंह कुटुंबातील कोणीही घराबाहेर दिसत नव्हते. त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी याबाबत पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर महिपाल पाठक आणि पंकज त्यागी हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना सिंह कुटुंब राहात असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण एका खोलीत डॉ. अरुण सिंह यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर बेडमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी मृत अवस्थेत आढळली.
डॉ. अरुण सिंह यांनी आधी पत्नी आणि मुलांचा खून करून नंतर स्वत:चं जीवन संपवलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अरुण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी दिली आहे. त्यामुळे तणावातूनच त्यांनी कुटुंबातील सदस्यांचा खून करून नंतर आत्महत्या केल्याचा संशय आहे.
दरम्यान, पोलिसांना चौघांचेही मृतदेह रुग्णालयात पाठवले असून शवविच्छेदन अहवालातूनच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.