अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दे धक्का या मराठी विनोदी चित्रपटात धनाजी नावाच्या पात्राला चोरी करण्याचा रोग झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र आता गुजरातमधील बडोदा येथून समोर आलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यामध्ये चक्क एक डॉक्टरच चोरीची चटक लागल्याने डॉक्टरकी सोडून अट्टल चोर बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बडोद्यामध्ये क्राईम ब्रँचने तीन कार चोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यापैकी एक जण डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे. या तिघांविरोधात आतापर्यंत १४० हून अधिक तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच अटक होईपर्यंत हे तिघेही बडोद्यातील पोलीस ठाण्यामध्ये वाँटेड होते.
या चोरांविरोधात सर्वप्रथम करेलीबाग आमि रावपुरा पोलीस ठाण्यामध्ये कारचोरीच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. क्राईम ब्रँचकडून त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, एक व्यक्ती इको कार घेऊन बडोद्याला आली असून, तिच्याकडील कार ही चोरीची आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या व्यक्तीला पकडले. पकडण्यात आलेल्या व्यक्तीने आपलं नाव हरेश मानिया असल्याचे सांगितले.
हरेश याचे आणखी दोन सहकारीसुद्धा बडोद्यामध्ये आले असल्याची माहिती चौकशीमधून समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अरविंद मानिया आणि ताहेर अन्वर हुसेन या दोघांना पकडले. हरेश आणि अरविंद हे भाऊ असल्याचेही पोलीस तपासामधून उघड झाले. दरम्यान, ते गाड्या चोरून राजकोटला पाठवायचे. तिथे या गाड्यांचे स्पेअर पार्ट वेगळे करून विकले जात असल्याचे तपासामधून समोर आले. या तिघांविरोधात आतापर्यंत १४० हून अधिक कार चोरल्याची तक्रार नोंद आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हरेश याच्या जवळ बीईएमएसची पदवी आहे. तसेच एकेकाळी त्याने स्वत:चा दवाखानाही उघडला होता. मात्र त्याला कारचोरीची चटक लागली. त्यानंतर त्याने हा दवाखाना बंद करून चोरांची टोळी सुरू केली. अटक केल्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्याकडून एक इको आणि एक ब्रेझा कार जप्त केली आहे. सध्या तिघांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केली आहे.