नवी दिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr Bhagwat Karad) पुन्हा एकदा गरजवतांच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी विमान प्रवासादरम्यान मागील सीटवरील प्रवासी अचानक कोसळून पडल्याचे समजतातच डॉ. कराड यांनी तत्काळ प्रथमोपचार करत त्याला दिलासा दिला. डॉ. कराड यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याच दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) ट्विट करून कराड यांचं भरभरून कौतुक केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी "भागवत कराड मनापासून डॉक्टर आहेत. माझ्या सहकाऱ्यांनी शानदार काम केलं आहे" असं ट्विट करत कराड यांचं कौतुक केलं. यानंतर डॉ. कराड यांनीही ट्विट करून रिप्लाय दिला. मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. कौतुक केल्याबद्दल खूप आभार असं म्हटलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनीही ट्विट करून कराड यांचं कौतुक केलं आहे. मी फक्त पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि त्यांच्या दृष्टीकोनातून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींनी कायम देश आणि जनतेची सेवा आणि समर्पणातून काम करण्यास सांगितलं आहे, असं डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या ट्विटला रिप्लाय देताना म्हटलं आहे.
डॉ. भागवत कराडांकडून विमान प्रवासात प्रवाशावर आपत्कालीन उपचार
भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे मराठवाड्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून देखील परिचित आहेत. रुग्णांच्या सेवाकार्यादरम्यानच त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. नगरसेवक ते खासदार आणि आता केंद्रीय राज्यमंत्री असताना देखील त्यांनी रुग्णसेवेचे व्रत पाळलेले दिसते. काही दिवसांपूर्वी शहरातील सुभेदारी विश्रामगृहासमोर अपघात झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ धाव घेत जखमींवर उपचार केले होते. असाच प्रसंग सोमवारी विमान प्रवासादरम्यान देखील पाहायला आला. डॉ. कराड हे इंडिगो विमानातून प्रवास करता असताना मागील सीटवरील प्रवासी कोसळून पडला. याची माहिती मिळताच डॉ. कराड यांनी तत्काळ त्या प्रवाशावर उपचार केले. डॉ. कराड यांच्या समयसूचकतेने आणि सेवाभावामुळे योग्य उपचार मिळून त्या प्रवाशाचे प्राण वाचले. यानंतर सोशल मीडियात केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी याबद्दल पोस्ट शेअर करत भारतीय संस्कृतीच्या शिकवणीप्रमाणे कायम मदतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
"एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ"
'प्रवासादरम्यान इंडिगो फ्लाइटमध्ये 12 A सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला अचानक गंभीर आरोग्य समस्या उद्भवली व तो कोसळून पडला. मी समोरच्या सीट वर होतो विमानात अचानक कुजबुज सुरू झाली आणि मला कळाले. एका क्षणाचा देखील विलंब न करता, कुठलाही मिनिस्ट्री प्रोटोकॉल विचारात न घेता मी एक डॉक्टर म्हणून त्याला ताबडतोड सुश्रुषा केली. आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते, याची काल परत एकदा अनुभूती घेतली. आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या'' असं कराड यांनी म्हटलं आहे.