बेतिया – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. बेड्स, ऑक्सिजन यांचा अभाव असल्याने अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळत नाही. काहींनी तर रुग्णालयाच्या समोरच जीव सोडला. कोरोनाच्या या संकटकाळात आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. यातच डॉक्टर आणि नर्सेस स्वत:च्या जीवाची बाजी लावून रुग्णांवर उपचार करताना दिसतात. कोविड योद्धे म्हणून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होते.
या महामारीत सर्वसामान्य रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाही या बातम्या रोजच ऐकायला मिळत आहेत. परंतु जे डॉक्टर दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये ते ड्युटी करत आहे. त्याठिकाणीही डॉक्टरला बेड मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण पश्चिमी चंपाकरणच्या नरकिटयागंज परिसरातील आहे. जिथे ड्युटी करताना डॉक्टर राजीव कुमार पांडेय आजारी पडला त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करणंही कठीण झालं.
पत्नीचा दावा
हॉस्पिटलच्या गैरव्यवस्थापनाचा बळी पडलेले डॉक्टर राजीव कुमार पांडेय यांच्या पत्नी अनामिकाने सांगितले की, माझ्या पतीची तब्येत बिघडल्यानंतर मी आणि माझे सासरे यांनी राजीवला रुग्णवाहिकेतून उपविभागीय हॉस्पिटलला आणलं. परंतु हॉस्पिटलमध्ये आमची विचारपूस करणारंही कोणी नव्हतं. आम्ही राजीवला इकडून तिकडे घेऊन भटकत राहिलो. हॉस्पिटलचे आरोग्य प्रभारींचा मोबाईल ट्राय केला परंतु तोदेखील बंद होता असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या हॉस्पिटलमध्ये माझ्या पतीने ओवरटाईम केले, रुग्णांची सेवा केली आज त्यांना स्वत:ला कोविड चाचणी आणि उपचारासाठी भटकावं लागतंय. कोणीही आमचं ऐकणारा नाही असं त्यांच्या पत्नीने आरोप केला तर राजीवचे वडील म्हणाले की, राजीव मागच्या ४-५ दिवसांपासून आजारी आहे. त्याची कोविड चाचणीही केली नाही. तो डॉक्टर असल्याचं आम्ही सगळ्यांना सांगितले परंतु कोणी ऐकलं नाही. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरच्या मदतीला येत नाही पाहून खेद वाटतो अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. राजीव पांडेय हे उपविभागीय हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्यांची ड्युटी आयसोलेशन वार्डात लावली होती. परंतु ४ मे रोजी तब्येत बिघडल्यानंतर राजीवची चाचणी केली तेव्हा ते पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. सोमवारी त्यांचे कुटुंबीय राजीवला घेऊन रुग्णालयात पोहचले. परंतु तासभर कुटुंबीय भटकत राहिले पण कोणीही मदतीसाठी आलं नाही. ज्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी याची दखल घेतली. तेव्हा राजीवची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली परंतु ती निगेटिव्ह आली. राजीव सध्या होम क्वारंटाईन आहेत. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.