इंदूर: मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये वास्तव्यास असलेले एक डॉक्टर त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या एका शिक्षिकेसोबत गुपचूप विवाह करत होते. मात्र तितक्यात त्यांची पहिली पत्नी तीन मुलांसह लग्न मंडपात पोहोचली. त्यामुळे डॉक्टरांचे मनसुबे धुळीला मिळाले. डॉक्टरांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता याच डॉक्टरांच्या मुलानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इंदूरच्या कंपेलमध्ये राहत असलेले डॉक्टर जितेंद्र दांगी तीन दिवसांपूर्वी एका ट्युशन टीचरशी लग्न करत होते. ही शिक्षिका त्यांच्या मुलाला घरी शिकवायला यायची. त्याच दरम्यान जितेंद्र आणि शिक्षकेचं सूत जुळलं. १९ जूनला इंदोरच्या खंडवा रोड परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये डॉक्टर गुपचूप दुसरं लग्न करत होते. या लग्नाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली. यावेळी मांडवात गोंधळ झाला. दरम्यान शिक्षिकेला मारहाणदेखील झाली.
शिक्षिकेनं पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांचा मुलगा यशवंतविरोधात गुन्ह्याची नोंद केली. यशवंतची रवानगी तुरुंगात करण्यात आली. मंगळवारी तो तुरुंगातून सुटला. त्यानंतर त्यानं दुपारी तीन ते चार दरम्यान पिस्तुलानं स्वत:वर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
यशवंतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगत त्याच्यावर दोन तासांत अंत्यसंस्कार केले. यानंतर पोलिसांना एक फोन आला. यशवंतनं आत्महत्या केल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीनं दिली. त्यानंतर पोलिसांनी यशवंतच्या वडिलांच्या दवाखान्याची आणि फार्म हाऊसची झडती घेतली. पोलीस स्मशानातही पोहोचले. मात्र तोपर्यंत यशवंतच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे काही अवशेष गोळा केले.