लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्काकांक्षी योजनेचा पुरता फज्जा उडताना दिसत आहे. लखनऊ मधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या डॉक्टरनीआयुष्मान भारत योजनेतून रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला असून कार्ड परत देत पंतप्रधान मोदींकडेच उपचाराला जा, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशातील 10 कोटी गरीब, गरजू कुटुंबांना आयुष्मान भारत या आरोग्य विमा योजनेद्वारे 5 लाखांचा विमा पुरविला आहे. यासाठी सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.
सोमवारी रात्री लखनऊमधील किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठाच्या इस्पितळामध्ये रुग्णाला घेऊन नातेवाईक आले होते. या वेळी त्यांनी आयुष्मान योजनेचे कुटुंबाला मिळालेले कार्ड दाखविले. मात्र, डॉक्टरने हे कार्ड पुन्हा माघारी देत उपचार करण्यास नकार दिला. तसेच हे कार्ड घ्या आणि पंतप्रधान मोदींकडे जा, असा उलट सल्लाही त्याने या रुग्णाच्या नातेवाईकांना दिला. याबाबतची तक्रार नातेवाईकांनी केल्यानंतर विद्यापिठाच्या प्रवक्त्याने या डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.