हैदराबाद : हैदराबादच्या सरकारी हॉस्पिटलमधीलडॉक्टर चक्क हेल्मेट घालून रुग्णांना तपासत आहेत. दुचाकी चालविताना हेल्मेट घालण्यासाठी हा काही सुरक्षा सप्ताह वगैरे नाही तर राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांनी ही योजना आखली आहे.
हैदराबादमधील उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये स्लॅब कोसळल्याने डॉक्टर आणि रुग्ण जखमी झाले होते. यामुळे येथील डॉक्टरांनी नवी सुरिक्षत इमारत तातडीने बांधून देण्याची मागणी केली होती. मात्र, कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतीमध्येच डॉक्टरांना जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करावा लागत आहे.
राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने डॉक्टरांनी नुकतेच रुग्णालय परिसरातील झाडांखाली तपासणीसाठी आलेल्या पेशंटना तपासले होते. तसेच स्लॅब कोसळण्याच्या भीतीने डॉक्टरांनी डोक्यावर हेल्मेट परिधान करून रुग्णांना तपासायचा निर्णय घेतला आहे.