ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २४ - तिच्याकडे वैद्यकीय पदवी आहे. डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करायचा परवाना आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे आहेत. फक्त तिच्याकडे नाहीये ते बारावी उर्तीण झाल्याचे प्रमाणपत्र. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. साधी बारावीची परिक्षा उर्तीण होऊ न शकलेली अर्चना रामचंद्रन ही महिला तामिळनाडूमध्ये डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस करत होती.
अर्चनाचा हा खोटेपणा तिच्याच नव-याने आणि सास-यांनी उघडकीस आणला. अर्चनाने डॉक्टर म्हणून वावरताना थामीझारसी थुलूकन्नम या महिलेचे नाव धारण केले होते. थामीझारसीच्या नावाने तिने खोटी वैद्यकीय पदवी मिळवली होती. थामीझारसीचा २००३ मध्ये मृत्यू झाला आहे. वडिल आर.रामचंद्रन यांच्या मदतीने अर्चनाने ही बोगस पदवी मिळवली होती.
तिचे वडिल माजी प्रशासकीय अधिकारी होते. अर्चना बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याची कागदपत्रेही तिच्या नव-याने आणि सास-याने तामिळनाडू स्टेट मेडिकल काऊंसिलकडे सादर केली आहेत. तामिळनाडू स्टेट मेडिकल काऊंसिलने डॉ. थामीझारसीचे नाव मेडिकल रजिस्टरमधून काढून टाकले आहे. पुढील आदेशापर्यंत तिला निलंबित करण्यात आले आहे. मेडिकल काऊंसिल तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.