लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौ जिल्ह्यातील एका दुर्घटनेत लहान मुलीचा हात खांद्यापासून तुटला होता. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या चिमुलकीचा हात जोडण्यास डॉक्टरांना यश आलं आहे. संजय गांधी स्नाकोत्तर आयुर्विज्ञान संस्थान (एसजीपीजीआय, लखनौ) च्या तीन विभागांतील २५ डाक्टरांनी ४ तास शर्थीचे प्रयत्न करुन लहानग्या मुलीचा हात जोडून तिला दिव्यांग होण्यापासून वाचवले. डॉक्टरांनी केलेल्या सर्जरीनंतर मुलीच्या हातातून पूर्वीप्रमाणे रक्तप्रवाह होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नर्व रीकंस्ट्रक्शन आणि मांस पेशींची लहानशी सर्जरी केल्यानंतर हाताच्या बोटांची गतीदेखील पूर्वीप्रमाणे होईल, असे डॉक्टरांनी म्हटलंय. ११ वर्षीय दिशा चा हात 23 फेब्रुवारी रोजी गुऱ्हाळात अडकून खांद्यापासून तुटला होता.
या अपघातानंतर दिशाच्या कुटुंबीयांनी तात्काळ तिचा हात एका पालीथिन पिशवीत टाकून एसजीपीजीआयच्या एपेक्स ट्रॉमा सेंटर येथे नेला. तेथे प्लास्टिक सर्जन प्रो. अंकुर भटनागर यांनी तपासणी केल्यानंतर हात पुन्हा जोडण्याचा निर्णय घेतला. प्रो. अंकुर यांच्या म्हणण्यानुसार, हात खांद्यापासून तुटण्याला दोन तास झाले होते. त्यामुळे, जर ४ तासांत सर्जरी न झाल्यास त्या चिमुकलीचा हात पुन्हा जोडता येणे अशक्य होते. त्यामुळेच, अर्ध्या तासांत तज्ज्ञांचा सल्ला घेत डॉक्टरांनी सर्जरी सुरू केली. त्यावेळी, दिशाचा बीपी सातत्याने कमी होत होता. आयसीयूच्या टीमने मेहनत घेतल्यामुळे ४८ तासांतच रक्तदाब नॉर्मल झाला. सर्जरीनंतर दिशाला प्लास्टिक सर्जरी वार्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले. आता, ती पूर्णपणे ठीक आहे. डॉक्टारांचे आभार मानताना कुटुंबीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
दरम्यान, सर्जरी यशस्वी करण्यासाठी एका पथकाने तुटलेल्या हाताची हाडे, रक्त प्रवाह नलिका, मांसपेशी आणि नस यांना ठीक केले. तर, दुसऱ्या टीमने जेथून हात कट झाला होता, तिथे सर्जरी करण्यास सुरुवात केली. सर्वकाही ठीक झाल्यानंतर हाताच्या तंत्रिका, नस, मांसपेशी आणि त्वचेची जोडणी करण्यात आली. जवळपास चार तांसाच्या सर्जरीने दिशाचा हात पुन्हा जोडण्यात आला. यावेळी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षख प्रो. संजय धीराज, ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक प्रो. राजेश हर्षवर्धन आणि निदेशक प्रो. आरके धीमान यांनी ही मोठी उपलब्धी असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.