कोलकाता/मुंबई : पश्चिम बंगालमधील सरकारी महाविद्यालये आणि इस्पितळातील आंदोलक डॉक्टरांनी नरमाईची दाखवत, राज्य सरकारशी चर्चेची तयारी दाखविली असली, तरी डॉक्टरांचे आंदोलन रविवारी सहाव्या दिवशीही चालूच होते. चर्चेचे स्थळ मुख्यमंत्र्यांनी ठरवावे आणि चर्चा बंद खोलीत न घेता पत्रकारांच्या उपस्थितीत खुली व्हावी, असा आंदोलक डॉक्टरांचा आग्रह आहे.प. बंगालमध्ये डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन सोमवारी अनावश्यक वैद्यकीय सेवा बंद ठेवत देशव्यापी संप करणार आहे. मात्र, आपत्कालीन सेवा सुरू असतील. यामुळे देशभरातील तीन लाख, तर राज्यातील ४३ हजार खासगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार नाहीत. परिणामी, सोमवारी राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांतील आरोग्यसेवेवर ताण येण्याची शक्यता आहे.द ट्रेनड् नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया या परिचारिकांच्या राष्ट्रीय संघटनेही कामबंदला पाठिंबा दिला आहे. संघटनेचे साडेचार लाख सदस्य सोमवारी काळ्या फिती लावणार आहेत. तसेच असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट मुंबई व इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमॅजिंग असोसिएशन (महाराष्ट्र शाखा) यांनीही सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहापर्यंत एमआरआय, एक्स रे, सिटीस्कॅन, सोनोग्राफी अशा सर्व चाचण्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टरांचे आज देशभर कामबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:44 AM