मुंबई : कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. शुक्रवारी राज्यातील डॉक्टरांनी निषेध नोंदवत सकाळी ८ ते ५ या वेळेत रुग्णसेवा बंद ठेवली. यामुळे मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर किंचित फरक पडला तर मुंबईतील प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला नसल्याचे सर्व अधिष्ठात्यांकडून सांगण्यात आले. मात्र सकाळच्या वेळेत नेहमीच्या डॉक्टरांना रुग्णालच्या गेटवर पाहिल्याने रुग्णांमध्ये गोंधळ उडाला.
मुंबईतील पालिकेची तीन प्रमुख रुग्णालये, १९ उपनगरीय रुग्णालये तर राज्य सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर या निषेध आंदोलनात सामील झाले होते. ४५०० निवासी डॉक्टर तर ५ हजार इंटर्न डॉक्टरांनी आजच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे मार्ड व अस्मी संघटनांकडून सांगण्यात आले. शुक्रवारच्या रुग्ण सेवा बंदच्या घोषणा गुरुवारी रात्री उशिरा झाल्याने रुग्णालयातील रुग्णसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. डॉक्टरांच्या सर्व प्रमुख संघटनांनी यात उतरण्याचे ठरल्यावर रुग्णसेवा ज्येष्ठ डॉक्टर, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी करावयाची ठरली. अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनापूर्वी सांगण्यात आले. तर बाह्यरुग्ण कक्ष बंद राहणार असे सांगण्यात आले होते. मात्र बाह्यरुग्ण विभाग वरिष्ठ प्राध्यापक आणि इतर डॉक्टरांनी उपस्थिती लावली. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला नसल्याचे प्रत्येक रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती मार्ड, इंटर्न डॉक्टरांची अस्मी संघटना प्रत्यक्षात आंदोलनात उतरल्या होत्या तर महाराष्ट्र असोसिएशन आॅफ बॉन्डेड सिनिअर रेसिडंट डॉक्टर संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलनाबाबत बोलताना मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या अध्यक्षा डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले की, आम्हा डॉक्टरांची तुलना अन्य सेवांशी केली जात आहे. डॉक्टर सज्ज असतात का, असा सवाल आहे. सरकार डॉक्टरांच्या सुरक्षेवर गंभीर नाही. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर हल्ला झाल्यास हल्लेखोराला अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा. यातून अशा निंदनीय घटनांचा क्रम कमी होईल, असे मत डॉ. डोंगरे यांनी मांडले. तर इंटर्न डॉक्टरांच्या अस्मी संघटनेचे अध्यक्ष डॉ. ऋषीकेश मानकर यांनी सांगितले की, आता रुग्णसेवेसारख्या उदात्त सेवेतही भीती निर्माण झाली आहे. एकेकाळी डॉक्टरांना देव समजले जात असे, सध्या जीवघेणे हल्ले होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेवर केंद्र सरकारने ठोस भूमिका नक्की घ्यावी. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची सुरक्षा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होऊ नयेत म्हणून न्यायालयाने गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करावी, असे मत डॉ. मानकर यांनी मांडले. तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्य डॉक्टरांनी कामाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला.रुग्णालय प्रवेशद्वारावर डॉक्टरकेईएम, नायर, सायन तसेच जे जे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आज निवासी डॉक्टरांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. या वेळी त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. तर काहींनी डोक्यात हेल्मेट घालून डॉक्टरांना सुरक्षेची गरज असल्याचे दाखवून दिले. काहींनी रक्ताळलेले बँडेज डोक्यावर बांधून हल्ले थांबविण्याचा सल्ला दिला. सेव्ह द सेव्हर, आम्हाला कुटुंब आहे, आम्हीही मानव आहोत, आम्ही तुमचे डॉक्टर आहोत, अशा आशयाचे फलक हाती घेण्यात आले होते.
आज दिवसभरात नायर रुग्णालयात एकूण ५२५ निवासी डॉक्टर हजर होते तर ११७ डॉक्टर अनुपस्थित होते. बाह्यरुग्ण कक्षात ९०७ जणांना तपासण्यात आले. तर अंतर्गत ६५ रुग्णांना तपासले. एकूण शस्त्रक्रियांमध्ये ८ मेजर, ३ एलएससीएस, ६ कॅथलॅब, ३ प्रसूती केल्या. रोजच्याप्रमाणे बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. कारण सीनियर निवासी डॉक्टर व प्राध्यापक यांनी हा विभाग सांभाळला. तर मायनर-मेजर दोन्ही शस्त्रक्रिया सुरू आहेत.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, बा.य.ल. नायर रुग्णालय.९९ टक्के ओपीडी सुरू होती. रुग्णांची नेहमीसारखी गर्दी होती. अत्यावश्यक शस्त्रक्रिया विभागात थोडीफार तारांबळ उडाली; मात्र ती उल्लेख करण्यासारखी नव्हती.- डॉ. जोशी, अधिष्ठाता, सायन रुग्णालयआजच्या बंदची माहिती कळल्याने बाह्यरुग्ण आधीच कमी आले. तर सकाळी ८ ते १२च्या दरम्यान मेजर व मायनर ७० ते ८० शस्त्रक्रिया झाल्या. अद्याप सायंकाळपर्यंतची संख्या समजणे बाकी आहे. एकंदरीत केईएममध्ये साधारण स्थिती होती.- डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालयकेईएममध्ये मार्डचे रक्तदानदेशभर डॉक्टरांचे निषेध आंदोलन सुरू असताना केईएममधील डॉक्टरांनीदेखील निषेध केला. मात्र शुक्रवार, १४ जून हा ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने आंदोलनानंतर येथील डॉक्टरांनी रक्तदान केले. सायंकाळपर्यंत ६०० डॉक्टरांनी रक्तदान केल्याचे केईएमचे डॉ. दीपक मुंडे यांनी सांगितले.