नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका कनिष्ठ निवासी डॉक्टरवर सुरू असलेल्या उपचारांचा खर्च त्याच्या कुटुंबीयांना परवडणारा नसल्याने सुमारे शंभर डॉक्टरांनी एकत्र येऊन तीन लाख रुपयांचा निधी उभारला आहे. डॉक्टरांनी दाखविलेल्या या मानवतेच्या दर्शनामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोनाग्रस्त असलेल्या डॉक्टरचे नाव जोगिंदर (२७ वर्षे) असून त्यांचे वडील राजिंदर चौधरी शेतकरी आहेत. आपल्या मुलावर होणाऱ्या उपचारांच्या वाढत जाणाºया खर्चाने ते चिंतीत झाले होते. इतका मोठा आर्थिक भार पेलणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यांची ही स्थिती लक्षात आल्यानंतर दिल्लीतील सुमारे १०० डॉक्टरांनी एकत्र येऊ न जोगिंदरच्या उपचारांसाठी मदत करायचे ठरविले. या प्रयत्नांतून तीन लाख रुपये जमले असून त्यामुळे राजिंदर यांना दिलासा मिळाला आहे. तुम्ही पैशाचा विचार करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असे डॉक्टरांचे मेसेज राजिंदर यांना त्यांच्या मोबाइलवर येत आहेत.
राजिंदर चौधरी यांचा मुलगा जोगिंदर हे दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात निवासी डॉक्टर असून त्यांना २७ जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. जोगिंदर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाध्ये कनिष्ठ निवासी डॉक्टर आहेत. त्यांच्यावरील उपचारांकरिता निधी उभारण्यासाठी दिल्लीतील व बीएसए रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पुढाकार घेतला.
केजरीवाल यांना मदतीचे आवाहन
दिल्लीतील कोरोनाग्रस्त निवासी डॉक्टर जोगिंदर यांच्यावरील उपचारांसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे. उपचारांवर झालेला ३.४ लाख रुपयांचा खर्च माफ करावा अशी विनंती डॉ. जोगिंदर यांनी सर गंगाराम रुग्णालयाच्या संचालकांना पत्र लिहून केली आहे.