भोपाळ - काचा, खिळे दाखवण्याच्या स्टंटच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण मध्य प्रदेशातील एका शस्त्रक्रियेने डॉक्टरांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटातून दाढी करायच्या ब्लेडची पाती, काचा, साखळी, असे 5 किलो वजनाचे लोखंड काढण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील सोहोवाल गावातील 32 वर्षांच्या महंमद मकसूद नावाच्या रुग्णाच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याला शेजारच्या रेवा जिल्ह्यात उपचारासाठी पाठवण्यात आले. रेवा जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याला तपासणीसाठी आणल्यावर डॉक्टर प्रियांक शर्मा यांनी त्याच्या तपासणी केली व एक्स-रे काढले. त्यानंतर डॉ. शर्मा यांच्यासह सहा डॉक्टरांच्या चमूने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेत सापडलेल्या वस्तू पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.या रुग्णाच्या पोटात 263 नाणी, काचा, दाढीची ब्लेड्स, साखळी असे पाच किलो 'साहित्य' सापडले.
डॉ. शर्मा यांच्या मते या रुग्णाची मानसिक स्थिती नीट नव्हती, या वस्तू त्याने कुणाचेही लक्ष नसताना गुपचूप गिळंकृत केल्या आहेत. रेवाला आणण्यापूर्वी त्याच्यावर सतना येथे सहा महिने उपचार झाले होते पण तेथे त्याच्या प्रकृतीला आराम मिळाला नव्हता. यापूर्वीही अशा वस्तू गिळण्याच्या घटना घडल्या आहेत. इंदोरमध्ये महाराजा यशवंतराव रुग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेत एका 25 वर्षाच्या लेच्या पोटातून दीड किलो वजनाचा केसाचा गोळा काढला होता. ही शस्त्रक्रिया काही तास चालली होती. तर कोलकात्यात एका रुग्णाच्या पोटातून 639 नखे काढली गेली होती. या नखांचे वजन 1 किलो होते. या 48 वर्षांच्या रुग्णाला स्किझोफ्रेनिया( छिन्नमनस्कता) हा आजार झाला होता.