नवी दिल्ली - चमचे, टूथब्रश, चाकू या वस्तू घरामध्ये कामासाठी वापरल्या जातात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या पोटात अशा प्रकारचं सामान सापडलं असं कोणी सांगितलं तर ते खरं वाटणार नाही पण हो हे खरं आहे. डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून तब्बल 8 चमचे, 2 स्क्रू ड्रायव्हर, 2 टूथब्रश आणि एक चाकू बाहेर काढला आहे. हिमाचल प्रदेशातील लाल बहादूर शास्त्री सरकारी रुग्णालयात एका 35 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून या वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत.
लाल बहादूर शास्त्री सरकारी रुग्णालयात एका रुग्णाला 24 मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी शस्त्रक्रियेनंतर व्यक्तीच्या पोटातून 8 चमचे, 2 स्क्रू ड्रायव्हर, 2 टूथब्रश आणि एक चाकू बाहेर काढण्यात आला. हे सर्व पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला आहे. रुग्णावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टर निखिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आहे. हा रुग्ण मानसिकदृष्ट्या आजारी आहे. आता या रुग्णाची प्रकृती स्थिर असून हा प्रकार दुर्मीळ आहे. मानसिक आजार असल्यामुळेच या रुग्णाने या वस्तू गिळल्या असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
लोखंडाचे खिळे, पिन, चेन अन् बांगड्या; महिलेच्या पोटातून काढलं दीड किलोचं भंगार
अहमदाबादच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये काही महिन्यांपूर्वी एका महिलेच्या पोटातून लोखंडाच्या काही वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. संगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलोच्या वस्तू काढण्यात आल्या होत्या. संगीता महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवाशी असून मानसिक रुग्ण आहे. अहमदाबादच्या शाहरकोटडा परिसरात संगीता पोलिसांना फिरताना दिसली. कोर्टाच्या आदेशानंतर तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे एक्सरे काढले. त्यामध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर तातडीनं शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या. डॉ. परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या महिलेला 'एकुफेगिया' हा मानसिक आजार आहे. हा आजार असलेला व्यक्ती अशा विचित्र वस्तू गिळतात. परंतु अत्यंत दुर्मिळ असा हा आजार असल्यानं याचे रुग्ण क्वचितच आढळतात'.