नवी दिल्ली : नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरुद्ध (एनएमसी) काम बंद आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर परत येण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केले आहे. निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी त्यांनी याबाबत चर्चा केली.
डॉक्टरांच्या संघटनांनी असा आरोप केला आहे की, या विधेयकातील तरतुदी गरीबविरोधी, विद्यार्थीविरोधी आहेत. या विधेयकाविरुद्ध डॉक्टरांनी शुक्रवारीही आपले काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, याबाबत केंद्रीय मंत्री हर्षवर्धन म्हणाले की, मी आंदोलनकर्त्यांना समजावले की, हे ऐतिहासिक विधेयक डॉक्टर आणि रुग्णांच्या हिताचे आहे. याबाबत आपण त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरेही दिली. हे आंदोलन समाप्त करण्याची विनंती त्यांना केली. एम्स, सफदरजंग, आरएमएलच्या निवासी डॉक्टरांनी आणि फेडरेशन आॅफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (फोर्डा) आणि युनायटेड रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनशी (यूआरडीए) संबंधित डॉक्टरांनी या विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे.